Breaking News

इंडियन पॉलिटिकल लीग

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगात येऊ लागले असताना, दुसरीकडे इंडियन पॉलिटिकल लीग म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या 17व्या आवृत्तीसाठी राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. इथे यंदाही सामना दोन प्रमुख टीम (पक्ष) भाजप आणि काँग्रेस यांच्यात असून, उभय कर्णधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर पुन्हा एकदा उभे ठाकले आहेत. अन्य संघही आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानावर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याने विजयाचा चषक उंचाविण्यासाठी घमासान पाहावयास मिळत आहे.

आपल्या देशात ज्या तीन गोष्टींचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो, त्या म्हणजे राजकारण, क्रिकेट आणि चित्रपटसृष्टी. यापैकी क्रिकेटला भारतीय लोक जणू धर्म मानतात. टीम इंडियातील खेळाडूंचा फार मोठा चाहतावर्ग आहे. सातत्याने होणार्‍या वेगवेगळ्या स्पर्धा, मालिकांमध्ये भारतीय संघ सहभाग घेत असतो. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटमध्ये आयपीएलची के्रझ आहे. या अभिनव प्रयोगामुळे दर्शकांना चुरशीचा खेळ तर पाहायला मिळतोच, शिवाय त्यांचे मनोरंजनही होत असल्याने आयपीएलची लोकप्रियता कायम आहे. सध्या देशी-विदेशी खेळाडू या झटपट प्रकारातून भारतातील मैदानांवर आपल्या खेळाचे दर्शन घडवित आहेत. क्रिकेटप्रमाणेच देशभरात विविध निवडणुका वर्षभर होत असतात. अनेक पक्ष, नेते या निवडणुकांना सामोरे जातात. लोकसभा निवडणुकीच्या रूपाने देशातील सर्वात मोठा राजकीय संग्राम होऊ घातला आहे. देशवासीयांसह जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे.

लोकसभेच्या लढतीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. यंदाही प्रमुख झुंज ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’ अशीच आहे. यातील नमो संघ तगडा असून, त्यांचा कर्णधार नरेंद्र मोदी दिग्गज खेळाडू म्हणून उदयास आलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या संघाने 2014पासून अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत; तर रागा टीमचा संघनायक राहुल गांधी निवडक विजय आणि बहुतांश पराभव या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 2019मध्ये आपले राजकीय नशीब आजमावित आहेत. भाजप आणि काँग्रेससोबतच अन्य टीम व कप्तानही सज्ज झालेेत.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघात दरवर्षी खेळाडूंची सरमिसळ होत असते. त्यासाठी बोली लावली जाते. अशा वेळी सामना जिंकवून देणार्‍या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी संघमालक प्रयत्नशील असतात. गंमत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानेही पुढारी मंडळींचे इकडून तिकडे पक्षप्रवेश करणे दिसून आले. इथे थेट बोली लागत नाही, परंतु काही ना काही फायदा पाहूनच इनकमिंग-आऊटगोईंग होत असते, हे वेगळे सांगायला नको.

क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने सर्व खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. तरीदेखील कर्णधाराच्या एकंदर खेळीवर बरेच काही अवलंबून असते. त्याचप्रमाणे निवडणुकीत नेतृत्वाची रणनीती महत्त्वपूर्ण ठरते. याखेरीज एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी जशी तयारी आवश्यक असते, तसे निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेले काम बोलते. याउपर प्रत्यक्ष लढतीमध्ये उभयतांचे प्रदर्शनसुद्धा निर्णायक ठरू शकते.

तसे पाहिल्यास निवडणुका हादेखील एक खेळच आहे. दोन उमेदवार वा पक्षांमध्ये कोण तरी जिंकतो, तर कोण हरतो. त्यासाठी चुरस दिसून येते. लोकसभेची निवडणूक अर्थात इंडियन पॉलिटिकल लीग ही तर प्रतिष्ठेची आणि भवितव्य ठरविणारी स्पर्धा आहे. त्यामुळे ती जिंकण्यासाठी सारेच पक्ष जोमाने मैदानात उतरले आहेत. तेव्हा आता कोण कुणाची धुलाई करणार आणि कुणाची दांडी गुल होणार, हे पाहणे रंजक ठरेल.

-समाधान पाटील (9004175065)

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply