श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी धडाकेबाज भारतीय लष्कराकडून कारवाया केल्या जात आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात 12 महिन्यांच्या कालावधीत 157 दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. दोन दिवसांपूर्वीच पुलवामा येथील मलंगपुरामध्ये राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशनल कमांडर सैफ उल इस्लाम उर्फ डॉ. सैफुल्लाचा जवानांनी खात्मा केला होता. जून महिन्यात सर्वाधिक 49 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले, तर एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये 28 दहशतवादी मारले गेले. जुलै आणि ऑक्टोबरमध्ये 21 दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते. आकडेवारीनुसार दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या, जिथे ऑक्टोबरपर्यंत 138 दहशतवादी मारले गेले.