Breaking News

कर्नाळा बँकेच्या फसवेगिरीला दणका

ठेवीदारांना पैसे परत करण्यासंबंधी निर्देश देण्याचे आरबीआयचे आश्वासन

पनवेल : रामप्रहर वृत्त
ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेला निर्देश देण्याबरोबर या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने दिले आहे. त्यामुळे ठेवीदार संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले असून, कर्नाळा बँकेच्या फसवेगिरी, टोलवाटोलवी आणि मुजोरीला जोरदार दणका मिळाला आहे.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) प्रसिद्ध सनदी लेखापाल, माजी खासदार किरीट सोमय्या, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात शेकडो ठेवीदार व खातेदारांनी कर्नाळा बँकेचे संचालक मंडळ आणि आरबीआयच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. आरबीआयने कर्नाळा बँकेच्या संचालक मंडळाची संपत्ती जप्त करून पैसे द्यावे, अशी जोरदार मागणी त्यांनी या वेळी करीत आमच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे आम्हाला द्या, असा टाहो फोडला.
ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रशासन असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार प्रचंड चिंतेत आहेत.  
त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रीयपणे कार्यरत आहेत, मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिनधास्त उत्तरांची टोलवाटोलवी करीत आहे. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची चिंता वाढू लागली आहे. गोरगरिबांनी जागा-जमीन विकून आपल्या कष्टाची कमाई स्थानिक बँक म्हणून कर्नाळा बँकेत जमा केली. परतावा म्हणून त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते, मात्र बॅँकेतीलच मंडळींनी घोटाळा करून सर्वसामान्य माणसाचा पैसा हडप केला. त्यामुळे अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती ग्राहकांची झाली आहे. दरम्यानच्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन 840 ठेवीदारांचे तक्रारी अर्ज सादर केले व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याचे निर्देश कर्नाळा बँकेला देण्याची मागणी केली होती, मात्र त्यावर आरबीआयने समाधानकारक कार्यवाही न केल्याने धरणे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. या धडक आंदोलनाची दखल आरबीआयला घ्यावी लागली आणि आरबीआयच्या महाप्रबंधक रिना बॅनर्जी यांनी त्यांच्या दालनात शिष्टमंडळाशी चर्चा केली. माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व पदाधिकार्‍यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या वेळी त्यांनी ठेवीदारांच्या व्यथा मांडून त्यांना कर्नाळा बँकेकडून त्यांच्या कष्टाचे व हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळावेत, अशी आग्रही मागणी केली.
किरीट सोमय्या म्हणाले की, बँकेच्या संचालक मंडळाच्या मनमानी आणि बोगस कारभारामुळे स्वतःच्या पैशासाठी ठेवीदारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. नोकरी, जमीन, व्यवसायातील पैसे लोकांनी या बँकेत ठेवले, मात्र बँकेने त्यांच्या कष्टाची आयुष्याची पुंजी खाऊन टाकली. अशा परिस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे ठेवीदारांना पैसे मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
बँकेने ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करावेत यासाठी संघर्ष समितीने विचारणा केली. पैसे कसे द्याल ते सांगा. दोन महिन्यांच्या आत दिले, तर जाहीर सत्कारही करू, असे त्यांना जाहीरपणे सांगितले होते, मात्र बँकेच्या संचालक मंडळाने त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
या सर्व प्रकरणाबाबत संबंधित विभागाकडून अहवाल घेऊन ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक तत्काळ पावले उचलणार असल्याचे रिना बॅनर्जी यांनी आश्वासित केले. येत्या 15 दिवसांत ही कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले. यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला असून, ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी ठेवीदारांना व या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, पनवेल महापालिका प्रभाग समिती सभापती संजय भोपी, प्रवीण पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कुंडलिक काटकर, प्रभाकर आघारकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गरज पडल्यास जेलमध्ये जाऊ : किरीट सोमय्या
या वेळी किरीट सोमय्या म्हणाले की, कर्नाळा बँकेत 59 बोगस खात्यांच्या माध्यमातून 150 कोटी रुपये लंपास केले गेल्याचे तपासाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. एकूण घोटाळा 600 कोटी रुपयांचा आहे. आरबीआयने सांगितल्याप्रमाणे 15 दिवसांत तपशील कार्यवाही होणार आहे. यासाठी पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा आरबीआयच्या मुख्य कार्यालयात जाणार आहोत. ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी आमचे शेवटपर्यंत आणि कायम प्रयत्न असणार असून, गरज पडल्यास जेलमध्ये जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
घोषणांनी परिसर दणाणला
‘पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘अटक करा… अटक करा… विवेक पाटील व संचालकांना अटक करा’, ‘वापस करो… वापस करो… हमारी मेहनत पसीने की कमाई वापस करो’, ‘आरबीआय वुई नीड जस्टीस, वुई वॉन्ट जस्टीस’, ‘परत करा परत करा… आमचे पैसे परत करा’, ‘कर्नाळा बँक घोटाळ्यास जबाबदार कोण’, आरबीआयशिवाय आहेच कोण’, ’सर्व शाखा बंद… आरबीआयचे डोळे बंद, सहा महिने व्यवहार बंद… आरबीआयचे डोळे बंद’, ‘खातेदारांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या आरबीआय आणि सहकार खात्याचा धिक्कार असो’, ‘पैसे परत करा.. परत करा’, ‘गप्प का गप्प का आरबीआय गप्प का’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेेला होता.

घोटाळेबाज कारभारामुळे कर्नाळा बँकेचे 17 पैकी 12 शाखांमध्ये काम बंद आहे. ठेवीदार, खातेदार पैशासाठी वारंवार फेर्‍या मारत आहेत, मात्र बँक दमदाटी आणि मुजोरीने त्यांची दिशाभूल करून दादागिरीची उत्तरे देत आहे. हक्काच्या पैशासाठी नाहक त्रास ठेवीदारांना बँक देत आहे. बँकेने ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर द्यावेत व त्यासाठी आरबीआयने वेळोवेळी बँकेला निर्देश द्यावेत; अन्यथा यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार. जोपर्यंत ठेवीदारांचे सर्व पैसे मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम राहील.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती

ठेवीदारांना धमकवण्याचे प्रकार कर्नाळा बँकेकडून वारंवार होत आहे. ठेवीदारांना स्वतःचे पैसे मागायलाही या बँकेत चोरी ठरत आहे. बँकेचे चेअरमन विवेक पाटील यांच्याकडे दानत आणि नियत नसल्यामुळे पैसे दिले जात नाही. जवळपास एक हजार ठेवीदारांचे तक्रारी अर्ज आरबीआयकडे दाखल करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे विवेक पाटील यांनी स्वतःच्या मुलाचा संचालक मंडळातून राजीनामा करून घेतला. यातूनच मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून, ठेवीदारांचे पूर्ण पैसे मिळेपर्यंत संघर्ष करीत राहणार आहोत.
-आमदार महेश बालदी, अध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती

सप्टेंबर महिन्यात मी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलो, त्या वेळी अवघे पाच हजार रुपये दिले गेले. त्यानंतर वारंवार बँकेत गेलो, मात्र पैसे मिळाले नाही. आरटीजीएस करू असे सांगण्यात आले होते, परंतु आजपर्यंत पैसे दिले नाहीत. मी विवेक पाटील यांना अनेकदा भेटलो. दरवेळी उद्या पैसे देतो असे ते सांगतात. त्यांचा उद्या कधीही उजाडत नाही.
-विनोद कुमार भाटिया, ज्येष्ठ नागरिक

आम्ही महाडवरून सात तासांचा प्रवास करून आलो आहोत. आमचे पैसे कर्नाळा बँकेत आहेत. पैशासाठी मी वारंवार बँकेत फेर्‍या मारल्या, विवेक पाटील यांना अनेकदा फोन केले, मात्र ते माझा फोन उचलत नाही. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. पैसे मिळेपर्यंत आंदोलन करीत राहणार.                        
-अनुराग पवार

ज्येष्ठ नागरिक हक्कांसाठी आंदोलनात आले आहेत. यामध्ये अनेकांची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांचे 50-50 लाख रुपये बँकेत असतानाही त्यांना विवेक पाटील पैसे देत नाही. आयुष्याची पुंजी बँकेत असतानाही पैसे दिले जात नाही. हा मोठा अन्याय आहे आणि तो आम्ही कदापिही सहन करणार नाही.
-मनोज सावंत

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply