Breaking News

सवतकड्याला मिळणार पर्यटनस्थळाचा दर्जा

मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीमधील  सुप्रसिद्ध सवतकडा येथील धबधबा साधरणपणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कोसळत असतो. यंदा पाऊस  लांबल्यामुळे हा धबधबा निरंतर सुरू आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. उंच डोंगरावरून कोसळणार्‍या या धबधब्यातून उडणारे तुषार हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. राज्य शासनाने इ-पास रद्द केल्यामुळे मुरुडमध्ये आता पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. मुंबई, बोरिवली, विरार, ठाणे व पनवेल येथील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटकांना उंच डोंगरावरून येणारे पाणी अंगावर घेण्यास खूप आवडत असल्याने मोठं मोठ्या धबधब्यावर जाणे पर्यटक अधिक पसंत करतात. ठिकाण किती लांब असले तरी पर्यटक त्या ठिकाणावर पोहचून पर्यटनाचा आनंद लुटत असतात. निसर्ग सौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुरूड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. निळाशार समुद्र, गार वारा, उंचचउंच डोंगरावर धुक्याच्या झालरीतून दिसणारी हिरवाई अशा रोमांचकारी क्षणांना अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले मुरूड तालुक्याकडे वळतात. पावसाळा सुरू झाला की तालुक्यातील सवतकडा धबधब्याकडे पर्यटक आकर्षले जातात. मात्र यंदा  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक आता सवतकडा धबधब्यावर आनंद घेताना दिसत आहेत. चहुबाजूने वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या, वृक्ष, वेली यामुळे या धबधब्याचे सौदर्य अजूनच खुलून दिसते. पावसाळा सुरु झाल्यापासून साधरणतः मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हा धबधबा कोसळत असल्याने या भागत नेहमीच पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत असते. सवतकडा धबधबा मुरूडपासून आठ तर वावडुंगी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. धबधब्याकडे जाणारा रस्ता जंगलातून जात असल्याने नागमोडी वाटा, पक्षांची किलबिलाट, हिरवा शालू नेसलेल्या टेकड्या असे  वातावरण पर्यटकांना उत्साहित करते. सवतकडा येथे येण्यास पर्यटक उत्सुक असतात. मात्र या ठिकाणी रस्ता होणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांनी लक्ष देणे खूप गरजेचे आहे. या पर्यटन स्थळाचा सर्व सुविधायुक्त विकास व्हावा, अशी मागणी अनेक वर्षापासून पर्यटनप्रेमींकडून होत आहे. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. येथे पर्यटकांना वाहने उभी करण्यापासूनच समस्यांना सुरूवात होते. परिणामी  मुरूडच्या विकासासाठी शासनाने विशेष पॅकेजची तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. पर्यटकांच्या माध्यामातून स्थानिकांना रोजगार मिळतो.  सवतकडा परिसरात येणार्‍या पर्यटकांच्या सोयीसुविधाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष द्यावे. वावडुंगी ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र भेकरे यांनी सवतकड्याला पर्यटनाचा दर्जा मिळावा, यासाठी पर्यटन मंत्रालयाकडे प्रयत्न केले होते, त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडे वावडुंगी ग्रामपंचातीला पर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. लवकरच सवतकडा येथे शासनाकडून मूलभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. पर्यटनाचा दर्जा प्राप्त होताच शासनाकडून सवतकडा येथे वाहनतळ, रस्ता, विश्रांतीगृह, बागिचा, विविध स्टॉल  आदी अनेक सुविधा प्राप्त होणार आहेत. कच्चा रस्ता असल्याने अगदी सहजपणे वाहन नेता येत नव्हते, म्हणून काही पर्यटक या ठिकाणी जात नव्हते. परंतु शासनाकडून  विविध सेवा उपलब्ध झाल्यानंतर सवतकडा येथे पोहचण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. सवतकडा परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणार असल्याचे पत्र सरपंच हरिश्चंद्र भेकरे यांना शासनाकडून  प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यकत्या विविध कागदपत्रांची पुर्तताही केली आहे. लवकरच आमच्या ग्रामपंचायतीला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त करणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सवतकडा धब धब्यामुळे वावडुंगी ग्रामपंचायतीस पर्यटनाचा दर्जा प्राप्त होणार असल्याने सर्व ग्रामस्थांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे. एका धबधब्यामुळे पर्यटनस्थळ विकसित होणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply