नवी मुंबई : प्रतिनिधी
श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2021 या ऑनलाइन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 20) विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी नवी मुंबई येथे मोठ्या जल्लोषात झाला.
या वेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आमदार मंदा म्हात्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच महामंत्री राजेश पाटील, विजय घाटे, कृष्णा पाटील, निलेश म्हात्रे, माजी जिल्ह्याध्यक्ष मारुती भोईर, दुर्गा डोक महिला अध्यक्ष, दत्ता घंगाले युवा मोर्चा अध्यक्ष, नगरसेवक अशोक गुरखे, दीपक पवार, विजया घरत, विक्रम पराजुली, संपत शेवाळे, जयश्री चित्रे, सुहासिनी नायडू जगतविख्यात जादूगार सतीश देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपा जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
सुरक्षित नियमांची खबरदारी घेत नवी मुंबईत प्रथमच नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2021 हा ऑनलाइन पद्धतीने भरगोस स्पर्धकांच्या सहभागात झाला.
गायन आणि नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी परीक्षक, मान्यवर व प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच चित्रकला, निबंध, पाककला, वेशभूषा, पॉट पेंटिंग, मेहंदी आदी स्पर्धांमध्ये नावीन्य मिळवलेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नवी मुंबईतील स्पर्धक व मान्यवर उपस्थित होते. नृत्य स्पर्धेत प्रशांत भालेराव, गायन स्पर्धेत समृद्धी जाधव, चित्रकला स्पर्धेत भव्य संयुक्ता, ईश्वरी दरेकर, संप्रीती डोग्रा, पॉट पेंटिंग मध्ये श्रुती भिंगारदिवे, निबंध स्पर्धेत कोमल सिंग, दीपमाळा यादव, आकांशा सहा, वेशभूषा स्पर्धेत श्रद्धा शिंपी, रिद्धीश पाटील व मेहंदी स्पर्धेत संवेदना धुमाळ, रोझी शर्मा यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, जागतिक कीर्तीचे चित्रकार सुभाष पवार, गायक युक्ता पाटील व नृत्य दिग्दर्शक स्वदेश वरणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
आमदार मंदा म्हात्रेंच्या वाढदिवसाचे औचित्य
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त नेरूळ पश्चिम मंडळाचे अध्यक्ष राजू तिकोने यांनी त्याच्या कार्यकर्त्यांसमवेत आ. म्हात्रे यांना फेट्याचा मान देत शुभेच्छा दिल्या. या वेळी सर्वांचे धन्यवाद मानत आ. म्हात्रे यांनी सर्व स्पर्धक, प्रेक्षक आणि परीक्षकांचे आभार मानले.