अडीच वर्षे सत्तेत असतानादेखील शिवसेनेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्याचे सुचले नाही. मुख्यमंत्रीपद हाताशी असूनदेखील केवळ ‘असंगाशी संग’ केल्यामुळे साधे तैलचित्र लावणे हीदेखील अवघड बाब बनून गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नावच मुळी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे आहे. त्यांच्या कार्यकाळात आधीच्या सरकारने केलेली चूक सुधारली गेली याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. एखाद्या दिग्गज नेत्याच्या भोवती सारे राजकारण फिरत राहणे हे भारतीय लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. देशातील जवळपास सर्वच प्रांतांमध्ये अशी उदाहरणे सापडतील. जात, धर्म, प्रांत आणि भाषा हे सर्व अडसर ओलांडून जनप्रियता मिळवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते देशात आजवर निर्माण झाले आहेत. तामिळनाडूतील पेरियार किंवा पश्चिम बंगालातील ज्योति बसू किंवा ओडिशातील बिजू पटनायक अशी नावे घेता येतील. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर जनतेच्या मनातील अढळ स्थान कायमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मिळाले. त्यांच्या 97व्या जयंतीच्या निमित्ताने विधिमंडळाच्या वास्तुमध्ये त्यांचे तैलचित्र लावण्याची इच्छा आपल्या सर्वपक्षीय पुढार्यांना झाली हेही नसे थोडके. स्वर्गीय बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना हा पक्ष जवळपास सलगपणे सत्तेत राहिला आहे. तरीही त्यांच्यापैकी कुणालाच बाळासाहेबांचे तैलचित्र विधिमंडळात लावून कृतज्ञता व्यक्त करावी असे वाटले नाही. वास्तविक शिवसेनेचे संस्थापक अशी बाळासाहेबांची देशपातळीवर ढोबळ प्रतिमा असली तरी ते एका पक्षापुरते मर्यादित कधीच नव्हते. भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते नेहमीच बाळासाहेबांबद्दल आदर आणि आत्मीयता बाळगून असत. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी किंवा सुश्री सुषमा स्वराज यांच्यासारखे भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बाळासाहेबांच्या भेटीसाठी आवर्जून मातोश्रीवर पायधूळ झाडत. त्या काळात ‘हिंदुत्व’ हाच बाळासाहेब आणि भाजपच्या नेत्यांना घट्ट बांधणारा धागा होता. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी शिवसेना-भाजप ही युती अभेद्य करून ठेवली होती. तेव्हा आता भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधान भवनात लागले यात राजकारण शोधण्याचे कारण नाही. येथे राजकारणापेक्षा भावनेचा धागा अधिक महत्त्वाचा मानायला हवा. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लावण्याच्या मुद्दयावरून अलीकडच्या काळात राजकारण तापले. वास्तविक तसे व्हायला नको होते. अशा प्रकारचे राजकारण झालेले खुद्द बाळासाहेबांनादेखील आवडले नसते. विधानभवनात सोमवारी झालेल्या तैलचित्र अनावरणावेळी सर्वच पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित राहिले, ते बाळासाहेबांप्रतीच्या प्रेमाखातर. हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार म्हणवणारे ठाकरे कुटुंबीय मात्र या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाकी सार्या पक्षांचे नेते या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्रात या घडीला चार राजकीय पक्षांचे नेतृत्व स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करताना दिसते आहे. बाळासाहेब आमचेच असा ठाम दावा हे चारही पक्ष करत असतात. स्वर्गीय बाळासाहेबांच्या निधनानंतर अजुनही त्यांच्या नावानेच मते मागण्याची पाळी या नेत्यांवर येते यातच सारे काही आले. यामधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचेच प्रत्यंतर येते. त्यांच्या तैलचित्राबाबत राजकारण झाले नसते, तर अधिक बरे झाले असते असे मात्र वाटते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …