पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे प्रतिपादन
नागोठणे : प्रतिनिधी
सर्वच क्षेत्रात महिला आता आघाडीवर आहेत. भाजपच्या महिला पदाधिकार्यांनी आपल्या पाठीशी असणार्या महिलांना सबळ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या विविध योजना महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी शुक्रवारी (दि. 29) नागोठण्यात केले.
भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे विभागीय महिला मोर्चाच्या वतीने भाजपमध्ये प्रवेश करणार्या महिलांना नियुक्तीपत्र वाटप करण्याचा समारंभ शुक्रवारी सायंकाळी नागोठणे विभाग महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रेया कुंटे यांच्या निवासस्थानी पार पडला. त्यावेळी नगराध्यक्षा पाटील बोलत होत्या. श्रेया कुंटे यांचे सक्षम नेतृत्व असून त्या भाजपची प्रतिमा नागोठणे शहरासह विभागातील घराघरात पोहोचवतीलच, असा विश्वास प्रीतम पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हेमा मानकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राबविण्यात येणार्या महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली.
या वेळी नीलिमा राजे, वैशाली शेडगे, लीला अंबाडे, सुप्रिया शिर्के, सारिका पवार, मानसी शिर्के, जयश्री सहस्रबुद्धे, सीमा भिडे यांनी असंख्य महिलांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भाजप महिला मोर्चाच्या डॉ. मनीषा कुंटे, जयश्री भांड, वैशाली मपारा, ज्योती म्हात्रे तसेच विशेष आमंत्रित म्हणून रोहे तालुका भाजपाध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्यासह महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कुंटे यांनी केले. या कार्यक्रमानंतर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला.