Breaking News

योग्य पद्धतीने पुनर्वसन करा

सांबरकुंड धरणामुळे विस्थापित होणार्‍या शेतकर्‍यांची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

सांबरकुंड धरणाला आमचा विरोध नाही, आमची कुठलीही हरकत नाही. मात्र आमचे  पुनर्वसन योग्य पद्धतीने करा, अशी मागणी या धरणामुळे विस्थापित होणार्‍या शेतकर्‍यांनी जनसुनावणीमध्ये केली.  

अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत हद्दीत   चाळीस वर्षांपुर्वी मंजूर झालेला सांबरकुंड धरण मध्यम प्रकल्प अद्याप रखडला होता. मात्र आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून,  शासनाकडून तशी पावले उचलली जात आहेत. या धरणामुळे विस्थापित होणार्‍या खैरवाडी, जांबुलवाडी आणि सांबरकुंडवाडी या गावांच्या पुनर्वसनाबाबत खैरवाडी येथे प्रांताधिकारी शारदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली  जनसुनावणी घेण्यात आली. या वेळी आमचे  योग्य पद्धतीने पुनर्वसन करा, अशी मागणी विस्थापित होणार्‍या शेतकर्‍यांनी केली.   

नायब तासिलदार अजित टोळकर, हेटवणे मध्यम प्रकल्प कार्यकारी अधिकारी एस. डी. जाधव, उप अभियंता अरुण रोकडे, नयना सोनकर, दर्शना कांबळे यांच्यासह संबंधीत महसूल अधिकारी, आणि शेतकरी मोठ्या संख्येने जनसूनवणीला उपस्थित होते.

शेतकर्‍यांसमोर सांबरकुंड धरण संकलन राजिस्टरचे चावडी वाचन करण्यात आले. शेतकर्‍यांचे पुनर्वसन आणि स्वेच्छा पुनर्वसनबाबत प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी माहिती दिली. शेतकर्‍यांनी मागितलेल्या रामराजमधील जागेत शेतकर्‍यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. ज्यांना जागा नको त्यांना अतिरिक्त मोबदला देऊन त्यांचे स्वेच्छा पुनर्वसन केले जाणार आहे. स्वेच्छा पुनर्वसन काही शेतकर्‍यांना अमान्य असले तरी अनेकांना पुनर्वसन मान्य असल्याचे म्हटले आहे. गोठा, दुसरे घर यांचा मोबदला दिला जात असला तरी जागाही द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी या वेळी केली. साधारण विस्थापित होत असलेल्या शेतकर्‍याला आपल्या घराबाबत किमान सहा लाखपासून 10 लाखापर्यंत मोबदला मिळणार आहे.

संकलन रजिस्टरमध्ये काही त्रुटी असल्याने पुढील आठ दिवसात महसूल विभागाचे अधिकारी त्रुटींचे निराकरण करून 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा खैरवाडी येथे जनसुनावणी होणार आहे.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply