पनवेल : वार्ताहर
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि भारत विकास परिषद शाखा पनवेल या समाजसेवी संस्थांकडून बोंदारपाडा हे आदिवासी गाव दत्तक घेऊन त्याचे आत्मनिर्भर बोंदारपाडा करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे.
वाडीतील आदिवासी बांधवांना स्वयंरोजगार म्हणून कुठले व्यवसाय शिकण्यास आवडेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी वरील संस्थांच्या स्वयंसेवकांनी गावातील महिलांसोबत दोन ते तीन बैठका घेतल्या होत्या. त्या अनुषंगाने सहज विक्रीयोग्य खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पहिज्या सत्रात पाणीपुरीच्या पुर्या आणि कुरमुरे चिवडा पुढील प्रशिक्षण सत्रात त्यांना तिळगुळ वडी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याचा सराव करून आदिवासी महिलांनी अनेक पदार्थ बनविले. कार्यशाळेस रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांनी आपले सहकारी उपप्रांतपाल डॉ. हेमंत भालेराव, सूर्या काळे यांच्यासोबत भेट देऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला. या वेळेस गावातल्या एका गरजू कुटूंबाला हॅपी फॅमिली किटचे वाटप करण्यात आले.
ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे अध्यक्ष हर्मेश तन्ना, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षा ध्वनी तन्ना, भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्रे, सचिव रकल्पेश परमार, डॉ. प्रमोद गांधी, राजेंद्र ठाकरे, सैफुद्दीन व्होरा, कमांडर दिपक जांबेकर, महेंद्र उरणकर, डॉ. साधना गांधी, आभा जांबेकर, डॉ. किर्ती समुद्र, नितीन कानिटकर, ज्योती कानिटकर, स्वप्नेश विचारे, शीतल विचारे, सौ. पद्मजा या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. येत्या काही दिवसांत मोफत वैद्यकीय शिबिरे, लहान मुलांसाठी क्रीडा साहित्य वितरण आणि गावात सौर पथदिवे बसविणे असे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.