Breaking News

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली

64 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; उरणमध्ये दोन दिवस होणार पाणीकपात

उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर

उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून, नागरिकांना फक्त पुढील 64 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उरणकरांचा पाणीपुरवठा या आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे प्रभारी उपअभियंता रंजित काळेबाग यांनी दिली.

उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई हे एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील 37 ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो, मात्र या वर्षी रानसई धरणात येत्या एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांना पुरेल इतकाच 64 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या कडक उन्हाच्या तडाख्याने रानसई धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय मागील वर्षात पावसाचे प्रमाण यथातथा आहे. त्यामुळेही उरणच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर उरणकरांना पाणीटंचाईची झळ बसणार नाही याची दक्षता घेण्याचे उरण एमआयडीसीने ठरविले आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपअभियंता रंजित काळेबाग यांनी दिली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी सिडकोकडून हेटवणे धरणातून पाणी घेतले जाते. एमआयडीसीकडून 10 एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते, मात्र सिडकोकडून पाच एमएलडी इतके पाणी मिळते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उरणकरांना पावसाळ्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वाया न घालवता पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही काळेबाग यांनी केले आहे.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply