Breaking News

मोदी सरकारची ‘आर्थिक लस’

केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी तरतूद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) सादर केला. या बजेटमध्ये विविध क्षेत्र आणि प्रत्येक घटकासाठी तरतूद करण्यात आली आहे. ‘ज्या वेळी पहाट अंधारलेली असते त्या वेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो या रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाचा संदर्भ देत भारताची अर्थव्यवस्था अशाच प्रकारे झेप घेईल, असा विश्वास सीतारामन यांनी या वेळी व्यक्त केला.
कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. कोविड-19 विषाणूचे  समूळ उच्चाटन करण्यासाठी अतिरिक्त मदत करण्यास  केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट करून पुढच्या काही दिवसांत आणखी दोन कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील, असे सांगितले.
आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट बजेट
केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्राचे बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.32 लाख कोटी रुपये केले आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटदरम्यान आत्मनिर्भर स्वस्थ भारत या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेत पुढील सहा वर्षांसाठी 64,180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेत.
75 वर्षांवरील व्यक्तींना आयटी रिटर्नपासून मुक्ती
केंद्रीय अर्थसंकल्पात 75पेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली आहे, तर टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरून वाढवून 10 कोटी इतकी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री सीताराम यांनी केली आहे. दुसरीकडे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कररचना मागील वर्षाप्रमाणेच कायम राहणार आहे.
नाशिक, नागपूर मेट्रोसाठी विशेष तरतूद
महाराष्ट्रासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून, नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी, तर नागपूर मेट्रो-2साठी 5976 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली. राज्यातील ब्रॉडगेजचे 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय अर्थमंत्र्यांनी मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.
केंद्र सरकार शेतकर्‍यांना समर्पित
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, आमचे सरकार शेतकर्‍यांना समर्पित आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने सरकार काम करीत आहे. यूपीए सरकारच्या तुलनेत तीन टक्के जास्त निधी मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील शेतकर्‍याला मदत दिली गेली. तांदूळ, गहू, डाळीसह इतर शेतमालांच्या हमीभावात वाढ करण्यात आली. शेतकर्‍यांना लाभ दिला जात आहे.
भारतीयांचा निर्धार ठाम असतो!
कोरोनामुळे यंदा सर्व गोष्टींचा फटका बसला, मात्र त्याचवेळी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या विजयाचा उल्लेख करीत भारतीयांचा निर्धार हा ठाम असतो, असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत मिळवलेला विजय हा भारतीय तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचे सांगून तरुणांमधील जिद्द आणि देशातील जनतेमधील इच्छाशक्ती दाखवणारा हा विजय होता, असेही त्यांनी नमूद केले.

बजेट 2021-22

  • शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दिष्ट
  • प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद
  • 15 अत्यावश्यक आरोग्य केंद्र, दोन मोबाइल हॉस्पिटलची घोषणा
  • देशभरात सात मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार
  • कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख 78 हजार कोटींचा निधी
  • रस्ते विभागासाठी एक लाख 18 हजार कोटींचा निधी
  • 2030पर्यंत हायटेक रेल्वेचे लक्ष्य डोळ्यासमोर
  • सार्वजनिक वाहतुकीतील बसेसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी
  • विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा 49 वरून 74 टक्क्यांवर
  • सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद
  • एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
  • 100 नवीन सैनिक स्कूलची घोषणा
  • असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार
  • सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न
  • आदिवासी भागात 750 ‘एकलव्य’ शाळा उभारणार
  • डिजिटल जनगणनेसाठी 3 हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद
  • देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन
  • अनुसूचित जातीत मोडणार्‍या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती
  • उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1 कोटीने वाढवणार
  • लघु उद्योगांसाठी 15 हजार 700 कोटींची तरतूद
  • 5 फिशिंग हब विकसित करण्याची घोषणा
  • 15 वर्षे जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी

सर्वसामान्यांची जीवनशैली सुधारण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प वैयक्तिक, गुंतवणूकदार, उद्योग व याचबरोबर पायाभूत सुविधा क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे. यासाठी मी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नव्या कृषी कायद्यांद्वारे हमीभाव आणि बाजार समित्या बंद करणार असा संभ्रम शेतकर्‍यांच्या मनात निर्माण करणार्‍या विरोधकांची तोंडे बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. स्वतः अर्थमंत्र्यांनी किमान आधारभूत किमतीचे आकडे देत विरोधकांना आरसा दाखविण्याचे काम केले आहे.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते,
महाराष्ट्र विधानसभा

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply