पोलादपूर तालुक्याची ग्रामपंचायत असल्याने नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालेल्या नगरपंचायत कार्यालयीन कामकाजासह प्रशासकीय कामकाजामध्ये अपुर्या कर्मचारी संख्येचा अडसर कायम असून ग्रामपंचायतीमध्ये सेवेत असलेल्या कर्मचार्यांना समावेशनाशिवाय नगरपंचायतीचे काम करावे लागत असल्याच्या समस्येकडे शासनाचे लक्ष नाही. परिणामी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे यांना नगरपंचायतीचे गाडे पुरेशा कर्मचार्यांविनाच चालविण्यासह पंचवार्षिक निवडणुकांची तयारी करावी लागत असल्याने भविष्यातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत नियोजन करण्यासंदर्भात जराशीही उसंत मिळत नाही. या नगरपंचायतीत पारदर्शक कारभारासाठी अपेक्षित जागरूकता आणून जनतेला आगामी निवडणुकांसाठी सतर्क करण्याची गरज आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, मुरूड, अलिबाग, खोपोली, माथेरान, श्रीवर्धन, कर्जत, पेण, उरण या नगरपालिका आणि पाच वर्षांपूर्वी नव्याने निर्माण झालेल्या म्हसळा, माणगाव, पोलादपूर, तळा या नगरपंचायतींसाठी अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यातून दक्षिण रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी गेल्या ऑगस्ट 2020मध्ये निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा यशस्वी झाला आहे. नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून नगरपंचायत पोलादपूरच्या खात्यात तीन कोटींचा निधी जमा झाला आहे.
गेल्या आठवडाभरात पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून प्राप्त झालेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी चांगल्या प्रतीचा काँक्रीटचा रस्ता असताना त्याची दुरूस्ती करण्याऐवजी चक्क नव्याने रस्ता करण्याचा प्रकार होणार असल्यास हे विकासकाम कोणाच्या हिताचे आहे याबाबत प्रश्नकर्ते विरोधक अथवा शहरविकासासाठीची तळमळ असणारे लोक सत्ताधार्यांच्या प्रचंड बहुमतासमोर मूग गिळून गप्प बसलेले दिसत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे अद्ययावतीकरण करणे, राष्ट्रीय महामार्ग ते गोकुळनगर मेनरोड डांबरीकरण रस्ता व तीन स्लॅब ड्रेनेज करणे, सैनिकनगर येथील तीन अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, रमेश जगताप ते लेप्रसी मिशनपर्यंत आरसीसी रस्ता करणे, शिवाजीनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण व स्लॅब ड्रेनेज बांधणे, प्रभाग 4मध्ये अंतर्गत रस्ते व गटारे बांधणे, प्रभाग 5मध्ये अंतर्गत गटारे व रस्ता डांबरीकरण करणे, हनुमानगर येथील आरसीसी गटार बांधणे, प्रभाग 6मध्ये अंतर्गत रस्ते व गटारे बांधणे, पार्टेकोंड मुख्य रस्ता डांबरीकरण करणे, सैनिकनगर येथे कासार यांच्या घरापासून पवार यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार करणे, गोकुळनगर अंतर्गत आरसीसी गटार बांधणे, स्मशानभूमी ते चरई पूल रस्त्यापर्यंत डांबरीकरण करणे आदी कामांचा शुभारंभ झाला आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रशासनाने विविध विकासकामांच्या निविदा सरकारी संकेतस्थळावर अपलोड करून जी विकासकामे सुरू केली आहेत, ती कोणती आहेत, कोणत्या प्रभागामध्ये होत आहेत, ठेकेदार कोणते, कालावधी कोणता व अंदाजे रक्कम किती याबाबत कोणतीही माहिती पोलादपूरकर मतदारांमध्ये नाही. निविदा कोड स्पष्ट करणारी जाहिरात प्रसिद्ध करतेवेळी प्रशासन नियमांकडे बोट दाखविताना दिसत असले तरी अपारदर्शक कारभारासंदर्भात प्रशासनाची चार बोटे स्वतःकडेच दिसून येत आहेत.
पूर्वी तालुक्याची ग्रामपंचायत असताना ग्रामसभा होत असत, मात्र आता नगरपंचायतीच्या कारभारामध्ये नगरसेवकांनाच पुरेसा मत मांडण्याचा अधिकार आहे अथवा कसे याबाबत साशंकता असताना या टोपीखाली दडलंय काय अशा स्वरूपाच्या निविदा प्रसिद्ध होऊन पोलादपूरकर अंधारात राहिले आहेत. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य माजी झाले असून, प्रांताधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. या परिस्थितीत निविदा सूचनांचे स्वरूप गोपनीय असल्याचे दिसून येत आहे. हे पारदर्शक कारभाराचे द्योतक नाही इतपत समजण्यासाठी जागरूक मतदार अथवा नागरिक अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाहीत.
पोलादपूर नगरपंचायतीत आकृतीबंधानुसार रिक्त मंजूर पदांची भरती अद्याप झाली नसताना दुसरीकडे ग्रामपंचायतीचा जुना कर्मचारीवर्ग समावेशनाअभावी केवळ पूर्वीच्याच पगारावर काम करीत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी अनुभवी कर्मचार्यांना अर्धबेकारी पत्करावी लागली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीचे 1 मार्च 2014 रोजी नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. यानंतर राज्य सरकार संवर्ग सेवानिहाय पदसंख्या मंजूर करण्यात आली आहे. ब श्रेणीचे स्थापत्य व अभियांत्रिकी सेवा 1 पद मंजूर असूनही रिक्त आहे. क श्रेणीची लेखापाल व लेखापरीक्षक मंजूर पदे दोन असून 1 रिक्त आहे. करनिर्धारण व प्रशासकीय सेवा ब श्रेणीचे 1 पद आणि क श्रेणीचे 1 पद रिक्त आहे. विकास सेवा क श्रेणीचे 1 पद मंजूर असूनही ते रिक्त आहे. त्यामुळे या सर्व संदर्भ क्रमांक 1 पैकी 6 मंजूर पदांपैकी 3 पदे रिक्त असून 3 पदे भरलेली आहेत. याखेरीज संदर्भ क्रमांक 3 राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त लिपिक टंकलेखक 5 मंजूर पदांपैकी केवळ 1 पद भरले आहे, तर उर्वरित स्वच्छता निरीक्षक 1 मंजूर पद, तारतंत्री वायरमन 1 मंजूर पद, गाळणीचालक व प्रयोगशाळा सहाय्यक 2 मंजूर पदे, पंप ऑपरेटर वीजतंत्री जोडारी 1 मंजूर पद अशा एकूण 10 मंजूर पदांपैकी 9 पदे रिक्त आहेत, मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांची शिपाई, मुकादम आणि व्हाल्व्हमन ही तीन मंजूर पदे ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांच्या समावेशनामुळे भरली गेली आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीत राज्यस्तरीय संवर्गातील 19 मंजूर पदांपैकी केवळ 7 पदे भरली गेली असून 50 टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारीवर्ग असताना नगरपंचायतीच्या विकासाचे गाडे चालविण्याची जबाबदारी पोलादपूरचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी गेल्या वर्षभरात हजर होत समर्थपणे पेलल्याचा दावा करताना पोलादपूर नगरपंचायतीची नगररचना, अग्निशमन यंत्रणा, कचरा व्यवस्थापन, फिल्टरेशन प्लांट, बांधकाम आणि अंतर्गत रस्ते तसेच अन्य महत्त्वाच्या भविष्यातील विकासाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण कर्मचारी क्षमता असण्याची गरज स्पष्ट दिसून येत आहे.
दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नगरपंचायतीत नगरसेवक कसे असावेत याची जाणीव सद्यस्थितीत होत असताना प्रत्यक्षात मात्र तशा प्रकारची व्यूहरचना होताना दिसून येत नाही हे दुर्दैवच!
-शैलेश पालकर, खबरबात