Breaking News

काँगे्रसने महाराष्ट्राला लुटले

उद्धव ठाकरे यांचा माणगावमध्ये हल्लाबोल

माणगाव ़: प्रतिनिधी

राज्यात सत्तेवर असताना काँगे्रस, राष्ट्रवादीने सत्तेचा दुरुपयोग केला आणि आता चौकशा सुरू झाल्यानंतर युती सरकार सूडाने वागत असल्याच्या बोंबा काँग्रेसवाले ठोकत आहेत. काँगे्रस, राष्ट्रवादीने सत्तेवर असताना जनतेचे पैसे फस्त करून महाराष्ट्राला लुटले असल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 19) माणगाव येथे केली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी उद्धव ठाकरे यांनी माणगावमधील तटकरे महाविद्यालयाच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर (श्रीवर्धन) व आमदार भरत गोगावले (महाड) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकापवर जोरदार हल्लाबोल केला.  उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवसेनेने जबाबदारीने सरकारला साथ दिली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे. आपल्याला भरत गोगावले व विनोद घोसाळकर या दोघांना निवडून आणायचे आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ आम्हाला हवी आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आपण चूक केली. ती चूक या वेळी करू नका. रायगड लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा वचपा मला काढायचा आहे. यासाठी मला आपली साथ हवी आहे. श्रीवर्धनची जागा गेल्या वेळी थोडक्या मतांनी गेली. या वेळी येथून महायुतीचे विनोद घोसाळकर निवडून येणार आहेत. महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांनी चांगले काम केले असून  त्यांना विधानसभेवर पाठविण्याची जबाबदारी आपली आहे. रायगडातून सुनील तटकरे व आमदार जयंत पाटील यांना हद्दपार करण्यासाठी शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी केले. गेल्या 30 वर्षांमध्ये सुनील तटकरे व जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील वातावरण सडवले असून ते आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने स्वच्छ करायचे आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत महायुतीला चांगले वातावरण असून आपले सातही शिलेदार निवडून येणार असल्याचा विश्वास आमदार प्रवीण दरेकर यांनी या वेळी व्यक्त केला. ज्या चाकरमान्यांचा सुनील तटकरे अपमान करतात तेच चाकरमानी त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाहीत, असे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी सांगितले. आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, अ‍ॅड. राजीव साबळे, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, दक्षिण रायगड युवा सेना प्रमुख विकास गोगावले, भाजप माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, तालुकाप्रमुख गजानन अधिकरी, किशोर जैन, बिपिन म्हामुणकर, अरुण चाळके, प्रणिता पवार, नाना महाले, वसुंधरा गोडबोले, अरुणा वाघमारे, महेंद्र तेटगुरे, राजेश पानवकर, अजित तार्लेकर, कपिल गायकवाड, नितीन दसावते, उद्धव जाधव, नितीन बामगुडे, सचिन बोंबले, राजू शिर्के यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व जनसमुदाय या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply