Breaking News

दिल्ली हिंसाचाराचे षड्यंत्र

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत जे काही घडले ते कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. शेतकरी आंदोलकांची ही उत्स्फूर्त कृती असल्याचे मानले जात होते, मात्र हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांकडून नियुक्त विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासातून उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात पंजाब व अन्य काही राज्यांतील शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू केलेले आंदोलन आजही सुरूच आहे. वास्तविक या नव्या कायद्यांमध्ये काय काय तरतुदी आहेत ते समजून घेतले पाहिजे, मात्र त्या समजून न घेताच आंदोलनावरून राजकारण केले जात आहे. विशेष म्हणजे जे पक्ष व राजकीय मंडळी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता पाठिंबा देत आहेत त्यांनीच पूर्वी कृषी कायद्यांमधील तरतुदी मांडल्या होत्या. आपल्या जाहीरनाम्यात ते अधोरेखितही केले होते. आता केवळ भाजप व मोदी सरकारला विरोध म्हणून सुधारित कायद्यांना विरोध आणि आंदोलकांना समर्थन असा दुटप्पी डाव खेळला जात आहे. आपल्या देशाचे सक्षम व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी, त्यांच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी विरोधक काही ना काही अडचणी निर्माण करीत आहेत. लोकशाही पद्धतीने पंतप्रधान मोदींना मात देणे शक्य नसल्याने विरोधक मोदी सरकारविरुद्ध कट-कारस्थाने रचत असतात, परंतु शेतकरी आंदोलनातही हिंसाचार करून पंतप्रधान मोदींना धमकाविण्याचा प्रकार घडला. आपल्या देशात राज्यघटनेने प्रत्येकाला काही हक्क आणि अधिकार दिले आहेत. त्यानुसार एखाद्या गोष्टीबद्दल आपण आपले मत व्यक्त करू शकतो. प्रसंगी त्याला विरोध दर्शवू शकतो, पण तो करीत असताना आपल्यामुळे देशाची एकता आणि सार्वभौमतेला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित असते. तिथेच गडबड झाली. शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. एवढेच नव्हे तर लाल किल्ल्यावर वेगळाच झेंडा फडकवून तिरंगी ध्वजाचा अपमान करण्यात आला. तेव्हाच या रॅली आणि आंदोलनाविषयची सहानुभूती संपुष्टात आली होती. आता तर प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांकडून नियुक्त केलेल्या एसआयटी चौकशीतून करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उपद्रव करण्यासाठी काही खास समूहांना लाल किल्ला आणि अन्य परिसरात एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असेल तर ही गंभीर बाब आहे तसेच हे सर्व शेतकर्‍यांनी स्वत:हून केले की कुण्या राजकीय पक्षाने त्यांच्याकडून हे करवून घेतले हा प्रश्न निर्माण होतो. हे कुणीही केले असले तरी पूर्णत: चुकीचे आहे. आंदोलन करायचेच होते तर ते शांततेच्या मार्गाने चालू ठेवता आले असते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत नव्हते म्हणून काय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेचा मार्ग पत्करला नाही. ते शांतपणे पण धैर्याने आपल्या भूमिकेवर ठाम राहत मार्गक्रमण करीत राहिले. हळूहळू समस्त देश त्यांच्या पाठीशी एकवटला आणि नवा इतिहास रचला गेला. इथे ना संयम ना धैर्य. सर्व काही आतातायी स्वरूपाचे आहे. कृषी कायद्यांतील तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकार चर्चेस तयार असताना आंदोलक मात्र थेट कायदेच रद्द करा अशी हट्टी भूमिका घेऊन बसलेत. हिंसाचारामुळे त्यांच्या आंदोलनाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. आता यामागे कुण्या राजकीय पक्षाचा हात होता का हे स्पष्ट होणे बाकी आहे. पोलीस तपासात पूर्ण सत्य उघड होईल, अशी अपेक्षा आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply