पनवेल : वार्ताहर
कठोर आदेश देऊनही पनवेल कृषी बाजार समितीतील कांदा-बटाटा, भाजीपाला मार्केटमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात येत नसल्याने आजपासून वाशीसह पनवेल येथील भाजी मार्केट बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु हे भाजी मार्केट बंद झाल्याने अचानकपणे सर्व भाज्यांसह कांदा, बटाटे, लसूणच्या दरामध्ये वाढ झाली असून आज तर ही सुरूवात आहे. अजून दोन-तीन दिवसांनी सर्व दर 100 चा आकडा पार करतील. या भितीमुळे महिला वर्गांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
भाजी मार्केटमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक येत असल्याने वाशी एपीएमएसी मार्केट व पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजार समितीने रायगड जिल्हा उपनिबंधकांकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे ज्यांनी भाज्यांसह कांदा, बटाटे, लसूणचा साठा करून ठेवला होता त्यांनी आज तो माल बाहेर काढला आहे. परंतु सदर माल हा व्यापारी वर्ग चढ्या भावाने विकत असल्याने काल पर्यंत 15 रुपये किलो घेतलेले कांदे, बटाटे आज ते 40 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. हीच अवस्था भाज्यांची सुद्धा झाली आहे. अशाप्रकारे या दोन्ही बाजारपेठा अजून काही कालावधीसाठी बंद राहिल्यास या सर्व भाज्या 100 गाठतील असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरातील कमावती व्यक्ती ही घरातच बसली आहे. मध्यमवर्गीयांसह तळागळात राहणार्या लोकांचे या दिवसांमध्ये खूप हाल होत चालले आहेत. त्यातच अशाने दरवाढ झाल्यास पुढील दिवस निघणे कठीण असल्याचे मत महिला वर्गाकडून व्यक्त होत आहे.