Breaking News

‘वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल’

उरण : प्रतिनिधी

वाहनचालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी उरण व न्हावाशेवा वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीटी टाऊनशिप येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात केले.

उरण वाहतूक शाखा व न्हावाशेवा वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहात अतिशय मेहेनतीने उपक्रम राबविले असल्याचा उल्लेख करून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी वाहतूक पोलिसांमार्फत रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रबोधन व्हावे यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

उरण तालुक्यात मागील दोन आठवड्यांपासून रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू असून, त्या निमित्ताने शनिवारी (दि. 6) वाशी नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. या वेळी 66 रक्तदात्यांनी बहुमोल असे रक्तदान करून अपघातग्रस्त रुग्णांना इतर आजारातील रुग्णांना त्याचा पुरेपूर उपयोग व्हावा या दृष्टीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, असे उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी उपस्थितांना संबोधितांना म्हटले. या वेळी  पोलिसांमार्फत वाहतूक आणि अपघात याबाबत प्रबोधन व्हावे यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

या रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सावंत, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे, न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत कामत यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचार्‍यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply