माणगाव : प्रतिनिधी
शिवसेनेत मी जन्म घेतला. माझ्या कार्यकर्तृत्वाने शिवसैनिकांच्या मनात रुजलो. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन काम केले असल्याने मला मानणारा मोठा वर्ग आहे, मात्र रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्वार्थी नेत्यांमुळे माझी या पक्षात गळचेपी झाली. म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि तळा येथील भाजप नेते रवी मुंढे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. रवी मुंढे यांनी नुकताच शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत मुंबई येथे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी रविवारी (दि. 7) माणगाव तालुका भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र महाले व सहकारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुंढे यांचे स्वागत केले. शिवसेनेच्या स्वार्थी नेत्यांना रवी मुंढे पुढे जातोय हे पाहवत नव्हते. त्यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी पक्षनेतृत्वाचे कान भरले. या स्वार्थी नेत्यांनीच मला विधानसभेत पाडले. म्हणून शिवसेना सोडून भाजपत दाखल झालो आहे, असे सांगून ज्याप्रमाणे मी शिवसेना वाढविली तशाच प्रकारे आता दक्षिण रायगडात भाजप संघटना मजबूत करणार असून, आगामी नगरपंचायत निवडणुकीत पक्ष स्वबळावर लढल्यास आपली ताकद दाखवून देईन, असा निर्धार मुंढे यांनी व्यक्त केला.