Breaking News

मच्छीमारांना डिझेल परतावा देण्याबाबत दुर्लक्ष!

अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे स्थानिक मच्छिमार हैराण असतानाच सध्या त्यांना मासळीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मच्छिमारांना   किमान सात दिवस खोल समुद्रात जाऊन मच्छिमारी करावी लागते, या कालावधीसाठी बोटींवर असणार्‍या कामगारांना मजुरी देणे, बर्फाचा साठा करणे, डिझेल, बोटींवर सात दिवसाचे अन्नधान्य, किराणा माल, रॉकेल आदी स्वरूपाच्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी किमान 80 हजार रुपये खर्च होत असतो. सध्या खोल समुद्रातही मासळी सापडत नसल्याने मच्छिमारांचा हा खर्चसुद्धा निघत नाही. त्यामुळे समस्त मच्छिमार कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच शासनाकडून मिळणारा डिझेल परतावा त्यांना 2018पासून मिळालेला नाही, त्यामुळे मच्छिमार सोसायट्यासुद्धा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. रायगड जिल्ह्याचे सुमारे 24कोटी रुपये डिझेल परतावा रक्कम बाकी आहे. त्यापैकी संपुर्ण जिल्ह्यसाठी फक्त नऊ कोटी रुपये आल्याने त्यातून सर्व मच्छिमार सोसायट्यांना परतावा रक्कम मिळणे खूप कठीण झाले आहे. मासळीचा तुटवडा व डिझेल परतावा रक्कम मिळत नसल्याने मच्छिमार मेटाकुटीस आले आहेत. 

समुद्रात मासळी कमी मिळत असल्याने मार्केटमध्ये मासळीचा भाव गगनाला भिडले आहेत.  मुरुड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मासळीचे दर गगनाला भिडले असून सामान्य व माध्यमवर्गीय लोकांना मासळी खरेदी करणे खूप कठीण जात आहे. मटण सध्या 700 रुपये किलो दराने मिळत असून, तेव्हढे पैसे आता सुरमईच्या एका नगासाठी ग्राहकाला द्यावे लागत आहेत.   

खोल समुद्रात जाणार्‍या होड्यांना मोठ्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मुख्य बाजारातील मासळीची आवक घटली असून, मार्केटमधील मासळीचे दर गगनाला भिडल्याचे निदर्शनास येत आहे. अचानकपणे मासळीची आवक घटल्याने स्थानिकांबरोबरच पर्यटकांनासुद्धा जादा पैसे मोजून मासळी घ्यावी लागत आहे. त्यामुळे पर्यटकसुद्धा त्रास्त आहेत.

सध्या मासळी मार्केटमध्ये सुरमई, हलवा, पापलेट व कोलंबी हीच मासळी नजरेस पडत आहे. परंतु या मासळीची आवक कमी झाल्याने ग्राहकांना जास्त दराने मासळी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक आता मासळी मार्केटमध्ये जाणे पसंत करीत नाही.तर गरीब ग्राहक कोळंबी अथवा निवड घेण्याला प्राधान्य देताना दिसून येत आहे. मुळातच आवक कमी झाल्यामुळे प्रत्यक्ष लिलावात चढ्या भावाने मासळी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मार्केटमध्येही मासळीचे दर वाढले आहेत. मासळीचे भाव वाढल्याने ग्राहकांची गर्दी कमी झालेली दिसून येत आहे. एक महिना होऊनसुद्धा मासळीचे भाव कमी होत नसल्याने खवय्ये नाराज झाले आहेत.

मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे शेकडोच्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु सध्या त्यांनासुद्धा कोणत्याही हॉटेलमध्ये एका मासळी थाळी साठी किमान 600 ते 700रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांबरोबरच खवय्येसुद्धा हैराण झाले आहेत.

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मासेमारी करणे आणि मासळी मिळणेसुद्धा कठीण झाले होते. सन 2020पासून मच्छिमारांवर अनेक संकट कोसळली  परंतु आता वातवरण चांगले असतानासुद्धा मासळी मोठ्या प्रमाणात मिळत नाही.

सर्व बोटींवर अल्प मासळी मिळाल्यामुळे त्यांचा खर्चसुद्धा निघत नाही. मासळीचे प्रमाण कमी असल्याने  चढ्या भावाने लिलाव घ्यावा लागत असल्याने बाजारातसुद्धा मासळीचे दर वाढले आहेत.

सागर कन्या मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकु यांनी सांगितले की, खोल समुद्रात बोटी जाऊनसुद्धा मोठ्या प्रमाणात मासे मिळत नाहीत. मासळी कमी मिळत असल्याने दर वाढले आहेत. खोल समुद्रात वारे वाहण्याचे प्रमाण जास्त असल्याने तेथील मासळी निघून गेल्याची माहिती मकु यांनी दिली.

मासळी मार्केट मधील मासळीचे आजचे दर

सुरमई    मध्यम साईज      700 रुपये               मोठी साईज 1600

पापलेट  मध्यम साईज      800 रुपये               मोठी साईज   2000

हलवा     मध्यम  साईज     400 रुपये               मोठी साईज 1000

रावस      मध्यम साईज      800 रुपये               मोठी साईज उपलब्ध नाही

कोलंबी   मध्यम साईज      600 रुपये               मोठी साईज 1200

-संजय करडे, खबरबात

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply