पनवेल : वार्ताहर
कळंबोली परिसरातील महिला व मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे यासाठी स्वयंमसिद्धाचे धडे देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवीर संघाच्या मदतीने स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वर्गाचा रविवारी (दि. 7) शुभारंभ करण्यात आला. यामध्ये प्रशिक्षणार्थींना मर्दानी खेळ शिकवले जाणार आहेत. यासाठी विजया कदम यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या मातीत रांगड्या मर्दानी खेळाला विशेष महत्त्व आहे. ही संस्कृती आणि परंपरा आणि ओळख कायम राहावी म्हणून राष्ट्रवीर संघाच्यावतीने शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण तरुण पिढीला दिले जाते. या माध्यमातून आपल्या इतिहासाची त्याचबरोबर पूर्वजांच्या पराक्रमाची ओळख आणि महती मिळते. शिवकालीन युद्धकला केवळ तरुण आणि पुरुषांकरिता मर्यादित न राहता. त्यामध्ये महिला आणि तरुणी सुद्धा पारंगत व पटाईत झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. महिलांना आपल्या स्वरक्षणासाठी ही कला अत्यंत उपयोगी आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्त्री शक्ती फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नितीन शेलार हे गेली अनेक वर्षे शिवकालीन युद्धकला, भारतीय व्यायाम शिकवत आहेत. जेणेकरून तरुण तरुणींनी मोबाइलचा अपव्यय टाळून मैदानावर आपली महाराष्ट्राची संस्कृतीबरोबर आपले आरोग्य जपेल. त्यांचे मन, मनगट, आणि मस्तिष्क मजबूत होण्यास मदत होईल. आणि येणार्या प्रसंगाला तोंड देता येईल. स्त्री फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रवीर संघाच्या सहकार्याने महिला मुलींसाठी कळंबोली येथे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. सुधागड हायस्कूलच्या सभागृहात या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक विमल बिडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण पर्हाड, पोलीस उपनिरीक्षक अंजना गायकवाड, हिंदू भुषण श्यामजी महाराज, अजित म्हात्रे, विलास पाटील, हरीचंद्र बोनकर, हभप अशोक महाराज पवार, प्रशिक्षक नितीन शेलार, स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापिका विजया कदम, सुरेखा करंजुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदर्श शिक्षिका ऋतुजा वाशिकर यांनी केले.
स्त्री शक्तीचे दर्शन
कळंबोली ते आयोजित करण्यात आलेला शिवकालीन युद्ध कलेमध्ये शिवकालीन व्यायाम, युद्धकौशल्य, मानसिक आत्मनिर्भरता, लाठी, काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, बौद्धिक व्यायाम व खेळ आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. यामध्ये महिला व मुलींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून. यातून खर्या अर्थाने स्त्री शक्तीचे दर्शन घडत आहे.
महिला व मुलींनी आपल्यावर होणार्या अन्याय अत्याचाराविरोधात प्रतिकार करावा. त्यांच्या मनगट आणि मनाला बळकटी मिळावी. त्या शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वयंसिद्ध व्हाव्यात या अनुषंगाने कळंबोली येथे राष्ट्रवीर संघाच्या मदतीने स्त्री शक्ती फाऊंडेशनने शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण हा पर्याय शोधला आहे. या प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली असून महिला व मुलींनी सहभाग नोंदवला आहे.
-विजया कदम, संस्थापिका स्त्री शक्ती फाऊंडेशन