परदेशी धर्तीवर समुद्रकिनारी सुरू करणार वाहनातून फूड स्टॉल
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात समुद्र, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनात वाढ होत असताना आता मत्स्य पर्यटनालाही वाव देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विकास विभागाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा निसर्गाचा आनंद घेत असताना येथील ताज्या मासळीवरही चांगलाच ताव मारत असतो. मत्स्य विभागाने मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गर्दीच्या समुद्र किनारी खवय्यांसाठी परदेशी पद्धतीने वाहनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मच्छी फूड स्टॉल निर्माण करण्याची योजना आखली आहे. तसेच मत्स्य संग्रहालय आणि माशांबाबत माहिती स्टॉलही उभारले जाणार आहेत. समुद्रकिनारी असलेल्या शंख शिंपले यांच्या वस्तू बनवून त्या महिला बचत गटांना विक्रीस देण्याची योजना आहे. त्यामुळे मत्स्य पर्यटनालाही चांगली चालना मिळू शकते, अशी माहिती जिल्हा मत्स्य सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी दिली.
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे लाखो पर्यटक पर्यटनास येत असतात. जिल्ह्यात मत्स्य संपदाही मोठी असल्याने पर्यटक येथील ताज्या माशांवर आडवा हात मारल्याशिवाय जात नाहीत. पापलेट, सुरमई, जिताडा, कोलंबी, खेकडे, कर्ली यासारखी मासळी जिल्ह्यात मिळते. जिल्ह्यात खास मासे खाण्यासाठीही अनेक पर्यटक आवर्जून येत असतात.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, रेवदंडा, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे मुख्य समुद्र किनारे आहेत. हजारो पर्यटक या समुद्रकिनारी भेट देत असतात. त्यामुळे त्यांना समुद्रावरच ताजे मासे खाण्याचा आनंद, त्यांच्याविषयी माहिती, समुद्रातील शंख, शिंपले यांच्यापासून बनविलेल्या वस्तू ह्या समुद्र किनारीच पर्यटकांना देऊ केल्यास मत्स्य पर्यटनाला चालना मिळणार आहे.
मत्स्य संपदा योजनेतून समुद्रकिनारी परदेशी धर्तीवर मत्स्य फूड स्टॉल उभारण्याची योजना आहे. यामध्ये समुद्रातील ताजी मासळीचे विविध तयार केलेले चविष्ट प्रकार खवय्यांना खाण्यास मिळू शकतात. त्याचबरोबर विविध माशांची माहिती, संग्रहालय याचीही योजना आखण्यात येत आहे. शंख, शिंपल्यापासून विविध वस्तू तयार करून ते बचत गटांमार्फत विक्रीस उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मत्स्य पर्यटनाला चालना मिळून स्थानिकानाही रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.
-सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग, रायगड