नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची स्टार बॉक्सर आजारपणातून सावरल्यानंतर 1 ते 7 मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणार्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. मेरी ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कृती दलातील खेळाडू सदिच्छादूत आहे.
सहा वेळा विश्वविजेत्या 37 वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा लाभलेल्या जॉर्डन येथील आशियाई स्पर्धेला तिला मुकावे लागले, परंतु आजारपणातून सावरल्यावर जानेवारीत मेरी बंगळुरूच्या राष्ट्रीय अकादमीत सहभागी झाली होती.
‘आता माझे शरीर मला उत्तम साथ देत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या डेंग्यूमुळे माझे बरेच नुकसान झाले. माझे वजनही कमालीचे वाढून 57 ते 59 किलोपर्यंत गेले, परंतु बंगळुरुमधील विशेष सरावामुळे आता माझे वजन 51-52पर्यंत कमी झाले आहे,’ असे मेरीने सांगितले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी समजूतदारपणाची आवश्यकता आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावेन, परंतु निकाल माझ्या हातात नाही.
-मेरी कोम