Breaking News

जेएनपीटीचे 27000 कोटींचे सामंजस्य करार

भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण

उरण ः रामप्रहर वृत्त

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. 2 ते 4 मार्चदरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार्‍या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी (दि. 24) बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी 27000 कोटी रुपयांचे 30 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या.

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते. सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करणार्‍या प्रमुख कंपन्यांमध्ये डीपी वर्ल्ड, जेएम बक्शी अँड कंपनी, गणेश बेंझो, बीपीसीएल, एनआयटीआईई, एसएस जी फार्मा प्रा. लि., सुरज अ‍ॅग्रो, जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक प्रा. लि., सिनलाइन इंडिया लिमिटेडचा समावेश असून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस, वेअरहाऊसिंग/कोल्ड स्टोरेज, एफटीडब्ल्यूझेड, फार्मा, कन्फेक्शनरी मॅन्युफॅक्चरिंग, अभियांत्रिकी सेवा, फूड प्रोसेसिंगसंबंधी सामंजस्य करार केले आहेत.

या वेळी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, जेएनपीटी संपूर्ण जगभरात बंदर उद्योगासाठी दर्जेदार सेवेचा बेंचमार्क स्थापित करण्यासाठी समर्पित असून आम्ही निरंतर व्यापारवाढीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने बंदरातील कार्यक्षमता व वाहतूक हाताळणी क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या गुंतवणूक केली आहे. ‘मेरीटाइम इंडिया समिट’मध्ये आम्ही विविध कंपन्यांसमवेत 30 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. त्यामुळे जेएनपीटीला देशातील गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत होणार आहे. कारण जगभरात कोविडचा परिणाम झाल्यानंतरही जेएनपीटी गुंतवणुकीचे आकर्षक केंद्र म्हणून कायम राहिले आहे. या कठीण काळातही जेएनपीटीमध्ये 27000 कोटींची नवीन गुंतवणूक झाली आहे. हे सामंजस्य करार केल्याने रोजगाराच्या विपुल संधी निर्माण होतील व आयात-निर्यात व्यापारास याचे विविध लाभ होतील. याव्यतिरिक्त या करारांमुळे भारत आणि आंतरराष्ट्रीय किनारपट्टीवरील व्यापाराच्या विविध संधी खुल्या होतील. भारतीय बंदरे आणि सागरी क्षेत्रातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीस चालना

देण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या पुढाकारातून मार्च 2021मध्ये 39; मेरीटाइम इंडिया समिट 2021चे आयोजन करण्यात आले आहे. 2 ते 4 मार्चदरम्यान आभासी (ऑनलाइन) पद्धतीने आयोजित करण्यात येणार्‍या या संमेलनात तीन दिवसीय शिखर संमेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एमआयएस 2021’चे उद्घाटन करण्यात येणार असून केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांचे स्वागतपर भाषण होणार आहे. सध्या भारतासह सर्व जग कोविडचा सामना करीत आहे. ही बाब विचारात घेऊन आभासी (वर्च्युअल) पद्धतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालय व फिक्की (एफआयसीसीआय) औद्योगिक भागीदार व ईवाय ज्ञान भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या संमेलनात 24 सहयोगी देश सहभागी होतील आणि 400हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे.

जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे पहिल्या सत्राचे ‘जागतिक दर्जाच्या बंदरांचा विकास’ संयोजक असतील. या सत्रात ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह मोठ्या बंदरांचा विकास, सुगम व्यापारासाठी 39; स्मार्ट बंदरे 39; विकसित करण्याचे महत्त्व व बंदरे आणि टर्मिनल्सच्या डिजिटलायझेशनचा प्रभाव-एआय, आयओटी, 5 जी टेक्नॉलॉजीमुळे होणारे बदल, नवीन मॉडेल ः पीपीपी आणि लँडलॉर्ड मॉडेल यावर ते भर देतील. त्याचबरोबर जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ हे ‘महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील विशेष सत्राचे संयोजक असतील. यामध्ये ते जेएनपीटी सेझमधील गुंतवणुकीच्या संधींवर

प्रकाश टाकतील.

भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात देशातील बंदरांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. त्याचबरोबर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर स्वत:ला एक धोरणात्मक व्यापार केंद्र म्हणून स्थापित करीत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठीसुद्धा बंदरांचे योगदान बहुमूल्य असेल. ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ हे भारतातील सागरी किनार्‍यावरील प्रत्येक राज्यामध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी एक अनोखे असे व्यासपीठ ठरेल.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply