Breaking News

ग्रामविकास अधिकार्याचे दर्शन झाले दुर्लभ

नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

कर्जत : बातमीदार

नेरळचे ग्रामविकास अधिकार्‍याचे ग्रामपंचायत कार्यलयात दर्शन दुर्लभ झाले आहे. बॉडीगार्ड तरुणांच्या गराड्यात असलेले ग्रामविकास अधिकारी अनंत सुळ यांची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली असून, ग्रामविकास अधिकार्‍याविना ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे.

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सलग तीन वर्षे एकही ग्रामविकास अधिकारी काम करू शकला नाही. यात नेरळ ग्रामपंचायतशी संबंधित असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांना सेवा मिळत नाही. 2020 मध्ये पनवेल येथून बदली होऊन आलेले अनंत सुळ यांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कामकाज सुरू केले.

कोरोना काळात कोणताही अधिकारी पूर्णवेळ देत नसल्याने येथील नागरिकांनीही ग्रामविकास अधिकारी सुळ यांच्याबाबत दुर्लक्ष करीत राहिले. मात्र सप्टेंबर 2020पासून सर्व शासकीय कामकाज व्यवस्थित सुरू झाल्यानंतरदेखील नेरळ ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळाले नाहीत.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या विकासकामांची बिले तयार आहेत, पण त्यावर ग्रामविकास अधिकार्‍याची सही नसल्याने ती बिले ठेकेदारांना देता येत नाहीत. पाणीपुरवठा योजनेतील वीजेच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी नाहीत. त्यामुळे महावितरणने ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन कापले आहे. ग्रामविकास अधिकार्‍यांची सही मिळत नसल्याने कामगारांचे पगार देता येत नाहीत आणि खरेदी थांबली आहे.

याबाबत सुळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आपण फेब्रुवारी महिन्यात नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होतो, मात्र त्या दिवशी शिवजयंतीची सुट्टी असल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करता आले नाहीत, अशी माहिती दिली.

ग्रामविकास अधिकारी अनंत कुमार सुळ यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. ग्रामपंचायतमधील सर्व पत्रव्यवहार आम्हालाच जबाबदारी घेऊन करावा लागत आहे. ग्रामविकास अधिकार्‍याच्या अनुपस्थितीचा फटका नेरळ ग्रामस्थ आणि यंत्रणेला बसत आहे.

-रावजी शिंगवा, सरपंच, ग्रामपंचायत नेरळ, ता. कर्जत

अनंत कुमार सुळ यांना कामात दिरंगाई आणि सतत गैरहजर असल्याने 25फेब्रुवारी 2021रोजी निलंबित केले आहे. नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार सावेळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोसावी यांच्याकडे देण्यात आला आहे.

-सुनील आयरे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कर्जत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply