व्हिव्हियन रिचर्ड्स इंग्लंडच्या खेळाडूंवर बरसले
जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना भारताने 10 गडी राखून जिंकला. हा सामना दोन दिवसांमध्येच संपल्याने खेळपट्टीवरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. अशातच आता वेस्ट इंडिजचे माजी महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी खेळपट्टीवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली असून, इंग्लंडच्या खेळाडूंना खडेबोल सुनावले आहेत.
व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत म्हटलेय की, भारत-इंग्लंडमध्ये अलीकडेच झालेल्या कसोटी सामन्याबाबत मला अनेकांनी प्रश्न विचारले. ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्यावरून बरीच टीका होतेय, पण जे टीका करताहेत त्यांना हे समजायला हवे की तुम्हाला अनेकदा सीमिंग खेळपट्टी मिळते, गुड लेंथवरून उसळी घेणारे चेंडू बघितल्यावर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी समस्या असल्याचा अनेक जण विचार करतात. अनेकदा फलंदाजांना तशा खेळपट्टीचा सामना करावा लागतो, पण आता तुम्ही दुसरी खेळपट्टी बघितली आणि म्हणूनच मला वाटते याला कसोटी क्रिकेट नाव देण्यात आले आहे. कारण तुमच्यातील सर्व बाबींची कसोटी यात लागते. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे अशी जर तुमची तक्रार असेल, तर ती नाण्याची दुसरी बाजू आहे. लोकं हे विसरतात की तुम्ही भारतात जाताहेत, तर तुम्हाला अशाच खेळपट्टीची अपेक्षा ठेवायला हवी. तुम्ही फिरकीच्या भूमीवर जात आहात. तुम्ही तिथे कशासाठी जाताहेत आणि तिथे कशाचा सामना करावा लागणार आहे याची तुम्ही तयारी करायला हवी.
दरम्यान, कसोटी लवकर संपल्यावरून रडगाणे गात बसण्यापेक्षा इंग्लंडने परिस्थिती समजून घ्यायला हवी. खेळ सुधारायला हवा. चौथ्या सामन्यात आपल्याला आधीच्याच खेळपट्टीवर खेळावे लागेल असा विचार करून त्यांनी तयारी करायला हवी. जर मी भारतात असतो किंवा खेळपट्टी बनवणे माझ्या हातात असते, तर चौथ्या कसोटीसाठी मी तशीच खेळपट्टी बनवली असती, असेही रिचर्ड्स यांनी या वेळी आवर्जून नमूद केले आहे.