Breaking News

परीक्षार्थींचा उद्रेक

राज्य सेवा परीक्षा आयोजनाच्या कामात सरकारी कर्मचारीच सहभागी असतात हे खरे आहे. परंतु त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ का आली याचे उत्तर मात्र मिळू शकत नाही. संबंधित कर्मचार्‍यांना याआधीच कोरोना नियंत्रणाच्या कर्तव्यातून मोकळे करून परीक्षेच्या कामाला जुंपता आले असते. साहजिकच वैतागलेल्या परीक्षार्थींनी इतके दिवस झोपला होता काय असा सवाल सत्ताधार्‍यांना केला. त्याला अर्थातच सरकारकडे उत्तर नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने राज्य सेवा पूर्वपरीक्षेबाबत गुरुवारी घातलेला गोंधळ संताप आणणारा होताच, परंतु जनसामान्यांसाठी तो कपाळावर हात मारून घेण्याजोगा होता. इतके संवेदनाशून्य सरकार महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिले नव्हते. या आधीच विविध कारणांमुळे तब्बल पाच वेळा पुढे ढकलली गेलेली एमपीएससीची पूर्वपरीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. पण नेहमीप्रमाणे कुठेतरी माशी शिंकली. आधी आयोगाने परिपत्रक जारी करून परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा उद्योग केला. त्यामुळे संतापलेले परीक्षार्थी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले. दुपारी पुण्यात हजारो परीक्षार्थी रस्त्यात ठिय्या देऊन सरकारच्या नावे खडे फोडू लागले. त्याचे लोण बघता बघता राज्यभर पसरले. पुण्यापाठोपाठ नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती अशा सर्वदूर भागांमधून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बातम्या येऊ लागल्या. हे सारेच अनपेक्षित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकत सत्ताधारी मंडळी आपापल्या घरी जाऊन वामकुक्षीसाठी पाठ टेकतात-न टेकतात तोच परीक्षार्थी आंदोलनाचा स्फोट झाला. एमपीएससीने घातलेला गोंधळ राज्यसरकारने जारी ठेवला, नव्हे त्यात भरच घातली. एमपीएससीने पूर्वपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय परस्पर घेतल्याचा दावा सुरुवातीला करून राज्य सरकारने हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु  तो सपशेल अपयशी ठरला. वास्तविक सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत  व पुनर्वसन खात्यानेच तसे आदेश एमपीएससीला दिले होते. परंतु आश्चर्याची बाब अशी की संबंधित खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना म्हणे या निर्णयाचा पत्ताच नव्हता! महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही एमपीएससीवरच खापर फोडत माध्यमांच्या समोरून पोबारा केला. महाविकास आघाडीतील दिव्य समन्वयाचे दर्शन सार्‍या महाराष्ट्राला पुन्हा एकदा झाले. प्रत्येक संबंधित खाते एकमेकांकडे बोट दाखवत होते. एकीकडे सत्ताधार्‍यांमधील हा सावळागोंधळ आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरलेल्या परीक्षार्थींचा उद्रेक क्षणाक्षणाने उग्र स्वरुप धारण करत होता. प्रकरण इतके हाताबाहेर गेले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सायंकाळी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनता आणि परीक्षार्थींशी संवाद साधावा लागला. तो सारा प्रकार पाहून हसावे की रडावे असेच कोणालाही वाटले असेल. मी तुम्हाला वचन देतो. आठवडाभरातच परीक्षा होईल आणि त्याची तारीख उद्या जाहीर होईल अशी बुचकळ्यात टाकणारी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारी यंत्रणा कोरोना नियंत्रणात गुंतली असल्यामुळे परीक्षेला उशीर होत आहे असे कारणही त्यांनी दिले. नेहमीच्या सवयीनुसार, परीक्षार्थींच्या या उत्स्फूर्त आंदोलनामागे विरोधक उभे असल्याचा साक्षात्कारही सत्ताधार्‍यांना झाला. आपले प्रत्येक अपयश कुणा ना कुणावर ढकलून देण्याची सवयच या सरकारला लागली आहे. परंतु हे फार काळ चालणार नाही. परीक्षार्थींचा असंतोष ही एक झलक आहे. या असंतोषाचे व्यापक स्वरुप लवकरच दिसू लागेल यात शंका नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply