साहेब आम्हाला कुष्ठरोग झाला म्हणून गावातून हाकलले, तेव्हापासून आम्ही इथेच राहतोय. पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झालंय, म्हणून आम्हाला इथून जायच्या नोटिसा दिल्यात, आता जायचे कोठे ? आम्हाला इथेच जागा द्या, 80 वर्षाच्या छबीबाई आंबेकर सांगत होत्या. पनवेलच्या कुष्ठरोग वसाहतीतील 24 कुटुंबांच्या या मागणीकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन पनवेलमधील कुष्ठरोग्यांची मागणी रास्त असल्याने त्यांना पनवेलमध्येच जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.
विधानसभेत सत्ताधारी कॉँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कुष्ठरोग्यांना केवळ मदत न करता त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करण्याची काही योजना करणार का? असा प्रश्न विचारला होता, त्या वेळी आरोग्य राज्यमंत्र्यांनी चुकीचे उत्तर दिले. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस त्यांच्या मदतीला धाऊन गेले आणि आमदार शिंदे यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, असे ठणकावून सांगितले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी, सूचना स्तुत्य आहे, सरकार त्या कल्पनेचा समावेश आराखड्यात करेल, असे सांगितल्याने पनवेलमधील श्री गणेश कुष्ठरोग वसाहत त्याकडे आता डोळे लावून बसली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
समाजाने नाकारलेल्या पनवेल, उरण तालुक्यातील कुष्ठरोग्यांची वसाहत पनवेल शहरातील प्रभाग 9 मधील सर्व्हे न. 389 या स्मशांनासाठी राखीव असलेल्या भूखंडावर वसली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 च्या बाजूला ही श्री गणेश कुष्ठरोग वसाहत आहे. या वसाहतीत 24 कुटुंबे आहेत. अकुर्ली, वाघिले या भागातून आलेली ही कुटुंबे या ठिकाणी झोपड्या बांधून राहू लागली, त्यावेळी मालगाडीतून येणार्या तांदळाच्या पोत्यातील सांडलेले तांदूळ गोळा करून, ते विकून त्यांची उपजीविका चालत होती, असे 80 वर्षाच्या छबीबाई आंबेकर सांगतात. आपल्या पती बरोबर त्या इथे आल्या, त्यावेळी त्या गरोदर होत्या त्यांच्या मुलाची मुले आज महाविद्यालयात शिकत आहेत.
पनवेल नगर परिषदेने त्यांना कालांतराने पाणी, शौचालय व विजेची सोय करून दिली. पिवळे रेशनकार्ड मिळाली. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला आहे. पण महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन सन 1995 च्या योजनेत त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत. समाजाने त्यांना लाथाडले होतेच पण सरकारने ही लाथाडले. जिल्हाधिकार्यांनी फेर सर्व्हे करण्याचे आदेश दिले. आपल्याला घर मिळावे, म्हणून त्यांनी सरकार दरबारी अनेक प्रयत्न केले. घर मिळण्याऐवजी सिडकोने त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला.
आशिया खंडातील मोठे रेल्वे जंक्शन पनवेलला होणार असल्याने त्याचा विकास करण्यासाठी कुष्ठरोग्यांना पुन्हा तेथून हलवण्यासाठी त्यांच्या झोपड्यांवर नबर टाकून नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांना येथून कल्याणला हलवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्यावर आज उपचार सुरू आहेत. त्यांना औषधे देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांची मुले येथील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. काहीजण छोटे- मोठे उद्योगधंदे, नोकरी किंवा हमाली करून उपजीविका करीत आहेत. असे असताना आम्ही कोठे जायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. प्रथम आमची राहण्याची सोय करावी, नंतर आमच्या झोपड्या पाडाव्यात, अशी मागणी संस्थेचे सचिव अशोक आंबेकर यांनी केली आहे.
आम्ही 50 वर्षे येथे राहत आहोत. कुष्टरोग झाला, म्हणून आमच्या पालकांना गावातून हाकलून लावले आहे. मी लहानाचा मोठा इथेच झालो. माझी मुले येथील महाविद्यालयात शिकत आहेत. आमचा शासनाला विरोध नाही पण आम्हाला पनवेलमध्येच जागा मिळावी अशी आमची मागणी आहे.
-अशोक आंबेकर, सचिव, श्री गणेश कुष्ठरोग वसाहत सेवासंस्था
आम्ही आकुर्लीला राहत होतो, आम्हाला तेथून हाकलले. आमच्यापैकी काही कुटुंबे मुलुंड, बोरीवलीला गेली. आम्ही पनवेलला आलो. त्यावेळी फक्त दिवा -पनवेल रेल्वे गाडी सुरू होती. त्यावेळी माझ्या मुलाचा जन्म झाला नव्हता. आज त्याची मुले कॉलेजला आहेत. आम्हाला आता जवळच जागा द्यावी.
-छबिबाई आंबेकर
माझा जन्म इथलाच, आमची मुले इथेच शाळेत जातात. त्यामुळे आम्हाला जवळच जागा मिळावी. माझ्या आईला चालताना खडा लागला तरी त्रास होतो. तिला उपचार करण्यासाठी न्यावे लागते. घरातील कामाला जाणारेही या भागातच मोलमजुरी करतात, त्यामुळे येथे जवळच जागा मिळावी.
-रंजना चव्हाण
-नितीन देशमुख, खबरबात