केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला खरमरीत पत्र लिहून स्पष्ट इशारा दिला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेला महाराष्ट्रात प्रारंभ झाला असून महाराष्ट्राची आरोग्ययंत्रणा त्यासाठी वेळीच सज्ज झाली नाही तर पुन्हा नव्या महासंकटाला तोंड द्यावे लागेल असे त्यांच्या पत्रावरून दिसते. म्हणजेच कोरोनाशी यशस्वी मुकाबला केल्याबद्दल महाविकास आघाडीचे सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत होते ते सारे पोकळ दावेच ठरले असे म्हणावे लागेल.
गेले दीडएक वर्ष तग धरून असलेले महाविकास आघाडीचे सरकार अखेरची घरघर लागलेल्या रुग्णासारखे दिसू लागले आहे. हे बिघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रावर संकटांमागून संकटे येऊन कोसळली. त्यातील काही संकटे नैसर्गिक आपत्तीच्या स्वरुपातील होती तर काही संकटांना या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे निमंत्रण मिळाले. निसर्ग वादळापासूनच आपत्तींची मालिका सुरू झाली. त्यापाठोपाठ अतिवृष्टी आणि अवकाळीच्या संकटांनी शेतकरी अक्षरश: देशोधडीस लागले. त्यांच्यासाठी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी महापुरात जणु वाहूनच गेली. नंतरचा काळ कोरोना विषाणूच्या थैमानाचा होता. गेल्या वर्षी याच सुमारास कोरोना विषाणूने आपला इंगा दाखवायला सुरूवात केली होती व सारा देश लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करू लागला. नवा अनोळखी विषाणू, नवी महाभयंकर साथ आणि आरोग्य यंत्रणेचा पत्ताच नाही अशी सुरूवातीला अवस्था होती. विषाणू अगदीच अनोळखी असल्याने त्यावर प्रभावी औषध उपलब्ध नव्हते व अजुनही नाही. मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा असे प्राथमिक व जुजबी सल्ले देण्यापलिकडे कोणाच्याच हातात काही नव्हते. अखेर नाईलाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनतेने समर्थपणे कोरोना विषाणूशी मुकाबला केला. इतकेच नव्हे तर, भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक प्रभावी लस देखील शोधून काढली. आता आपल्याकडे राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था देखील वेगाने सावरते आहे. पण महाराष्ट्रामध्ये काय चित्र दिसते? सारा देश कोरोनाच्या विळख्यातून यशस्वीपणे सुटका करून घेत असताना महाराष्ट्रातील रुग्ण मात्र वेगाने वाढत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातच पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार की काय अशी चर्चा होत आहे. लॉकडाऊनसारखा पर्याय आता परवडण्याजोगा राहिलेला नाही हे जनसामान्यांना देखील पटले आहे. योग्य ती काळजी घेत व कोरोनाविषयक निर्बंध पाळत प्रत्येकाने आपापल्या कामाला लागावे हा एकमेव पर्याय उरला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने सज्जड इशारा दिल्याबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री दिल्लीला धावले आहेत. राज्यातील दुसरी लाट कशी थोपवायची यासाठी आता धावपळ सुरू झाली आहे. चांगल्या कामाचे श्रेय आपले आणि बिघडलेल्या कामाचे खापर विरोधकांवर असा या सरकारचा खाक्या आहे. कोरोना संकट असो किंवा कायदा-सुव्यवस्थेच्या उडालेल्या चिंधड्या, शेतकर्यांची विदारक अवस्था असो किंवा वाढीव वीजबिलांचा घोळ हे सर्वच प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झाले आहेत. त्याचे अपश्रेय त्यांनाच घ्यावे लागेल. ऊठसूठ भारतीय जनता पक्षावर खापर फोडण्याची वृत्ती सोडून या सरकारने मरगळ झटकून कामाला लागावे. अर्थात त्यालाही आता उशीरच झाला आहे. सरकारचे अपयश महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. योग्य वेळी ती डोळे वटारेलच.