Breaking News

महाराष्ट्रात प्रथमच होणार गिधाडांची गणना

आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैसर्गिक पद्धतीने गिधाड संवर्धनाचा प्रकल्प राबविणारे रायगड जिल्ह्यातील पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांच्या सिस्केप संस्थेमार्फत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या गिधाड संवर्धन व संशोधन प्रकल्पांतर्गत 21 मार्च या जागतिक वनदिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड (पाली) या तालुक्यांतून गिधाडांची गणना सुरू आहे, मात्र या कार्यात सिस्केपसारख्या संस्था काम करीत असल्या तरी शासनाच्या वनविभागानेदेखील पुढे येऊन यात सहभाग घेऊन कोकणातील सर्वदूर जंगलातून हे अभियान राबविणे गरजेचे आहे. या वेळी वनविभागाने पुढाकार घेत या गिधाड गणनेचे पूर्व प्रशिक्षण नुकतेच श्रीवर्धन येथे यशस्वी केले.

सिस्केप संस्थेचे म्हसळा तालुक्यातील चिरगाव बागाची वाडी, महाड तालुक्यातील नाणेमाची येथील गिधाड संवर्धनाचे काम गेली तीन दशके सुरू असून विशेषत: पांढर्‍या पाठीचे व लांब चोचीचे गिधाड या प्रजातीच्या गिधाडांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यातच मध्यंतरी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक झाडांची पडझड झाली. त्यात गिधाडांची अनेक घरटीदेखील उद्ध्वस्त झाली. त्यामुळे नेहमीची ठिकाणे सोडून गिधाडांनी तात्पुरते स्थलांतर केले होते. या सगळ्यांचा नेमका या गिधाड प्रजातींच्या अधिवासावर काय परिणाम झालाय याबाबत नव्याने संशोधन होणे गरजेचे असल्याने जागतिक वनदिनाच्या निमित्ताने गिधाड गणना करण्याचे संस्थेने ठरविले. ही गिधाड गणना वनखात्याच्या सहकार्याने व अनेक पक्षीमित्रांच्या सोबतीने करण्यात येणार आहे. याकरिता घेतलेल्या पूर्व प्रशिक्षणात विविध गट तयार करण्यात आले आहेत. महाड तालुक्यातील नाणेमाची, सुधागड पाली तालुका, माणगाव तालुक्यातील वडघर, म्हसळा तालुक्यातील चिरगाव, सडकेची वाडी, भेकर्‍याचा कोंड, श्रीवर्धन तालुका अशा सहा ते सात ठिकाणी पाच पूर्व प्रशिक्षणार्थी व दोन वनखात्याचे कर्मचारी असा एकेक गट गिधाड गणना करणार आहे.

20 मार्च रोजी निरीक्षणस्थळी गटातील सदस्यांनी वस्ती केली. 21 मार्च रोजी पहाटेपासून त्या त्या जागी घरट्यांच्या ठिकाणी गिधाडांची मोजदाद झाली. पुढे दिवसभरात त्यांच्या विविध हालचाली, त्यांची जाण्याची दिशा, परत येण्याची दिशा अशा सर्व बाबींची नोंद घेतली जाणार आहे. या गिधाड गणनेमध्ये घरट्यांची एकूण संख्या, घरट्यामध्ये असलेल्या गिधाडांची संख्या, ते झाड कोणाच्या मालकीचे आहे, त्याचे गुगलवरील स्थान, त्यावरील गिधाडांची प्रजाती, झाडावर बसलेला पक्षी कसा दिसतो, उडताना त्यास कसे ओळखावे, त्याची उड्डाण पद्धत, घरटे बनविण्यासाठी वापरलेले साहित्य, घरट्यांतील पिलांची ओळख, घरट्यांची उंची व इतर निरीक्षणे, दुर्बिणीद्वारे निरीक्षण अशा परिपूर्ण शास्त्रीय दृष्टीने ही गिधाड गणना होणार असून या गिधाड गणनेमुळे सिस्केप संस्थेच्या भारतातील एकमेव नैसर्गिकरीत्या गिधाड संवर्धन व संशोधनाला एक नवा आयाम मिळणार आहे. हे पूर्व प्रशिक्षण एकूण 4.3 चौ. किमी अंतरातील विविध वाड्या, नारळ बागा आणि रस्ते दुतर्फा झाडे अशा परिसराचा अभ्यासात समावेश करण्यात आला. महाड येथून 27, मंबई येथून तीन, श्रीवर्धन स्थानिक बागायतदार चार आणि श्रीवर्धन आयटीआयमधील 15 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तसेच वनरक्षक, वन शिपाई आणि वनक्षेत्रपाल आदींनी या वेळी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. प्रत्येक प्रशिक्षणार्थीस गिधाडांचे चित्र असलेले टेम्प्लेटस फाइल्स देण्यात आले. सकाळी  5.45 वाजता निरीक्षणास सुरुवात करून सायंकाळी 7 वाजेपर्यंत निरीक्षण करण्यात आले.

सध्या सिस्केप संस्थेकडून या गिधाडांच्या संवर्धनासाठी स्वखर्चाने गिधाडांना अन्नपुरवठा केला जात आहे. जखमी किंवा कुपोषित गिधाडांचे संगोपन वनखात्याच्या निरीक्षणाखाली केले जाते. त्याकरिता गेली 30 वर्षे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संस्थेने गिधाडांविषयी जनजागृती केली आहे. सिस्केप संस्थेच्या या निसर्ग संवर्धन कार्याची आता शासनाने दखल घेऊन या प्रकल्पाला अर्थसहाय्य केले पाहिजे, तसेच आपल्या बागेतील नारळाच्या, आंब्याच्या व डोंगरातील इतर उंच झाडांवर घरटी केलेल्या त्या गिधाडांची अप्रत्यक्षपणे जपणूक या बागायतदारांनी केली आहे. वनखात्याकडून अशा बागायतदारांना

नुकसानभरपाई मिळावी याकरिताही संस्था प्रयत्न करीत असते, परंतु शासनाकडून गिधाड संवर्धनासाठी अशा नुकसानभरपाईसंदर्भात कायद्याची जोड मिळणे खूप गरजेचे आहे. याकरिता ही गिधाड गणना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे सरकार व्याघ्र प्रकल्प राबवत आहे. जसे पर्यावरणाच्या आणि वनांच्या अस्तित्वात वाघांचे  अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच या संवर्धनात गिधाडांचेही तेवढेच महत्त्व आहे. सरकारने गिधाड संवर्धन प्रकल्पासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील अस्तित्व धोक्यात असणार्‍या गिधाड आणि इतर जमाती जर आताच आपण संवर्धित केल्या नाहीत, तर भविष्यातील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.

-महेश शिंदे, खबरबात

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply