Breaking News

वर्षपूर्तीचा धडा

आपापले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, राजकारणाचे डावपेच खुंटीला टांगून ज्या-ज्या राज्यांनी केंद्र सरकारच्या साथीने कोरोनाशी मुकाबला केला, त्या राज्यांमध्ये कोरोनाचा विषाणू पुरता नमला आहे. दुर्दैवाने हा धडा महाराष्ट्र शिकलाच नाही, असे म्हणावे लागेल. कारण सार्‍या देशात कोरोना नियंत्रणात असताना महाराष्ट्रात मात्र रुग्णसंख्येचा स्फोट झालेला दिसतो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये उतरणीला लागलेली ही साथ पुन्हा उग्र रूप धारण करू लागली आहे.

खरे पाहता एखादे वर्ष हा काही फार मोठा कालखंड नव्हे, परंतु कोरोना विषाणूसारख्या महाभयंकर शत्रूशी लढता-लढता एक वर्ष उलटून गेले हे एखाद्या युगासारखे कोणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. गेल्या वर्षी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण देशाने उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कळकळीच्या आवाहनानुसार 137 कोटी भारतीय जनतेने कोविड-19 विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी आपण तयार असल्याचे दाखवून दिले होते. भारतीय जनतेची एकजूटच कोरोनासारख्या महासंकटाला परतवून लावेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला होता. तो आपल्या देशबांधवांनी आणि भगिनींनी सार्थ ठरवला. कोरोनाला पराभूत करण्याच्या संकल्पाची वर्षपूर्ती सोमवारी झाली. गतसाली 22 मार्च रोजी रविवार होता आणि लॉकडाऊन हा शब्ददेखील तेव्हा फारसा कुणाच्या कानावर पडला नव्हता. त्यानंतरचे वर्ष अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत गेले. गेल्या वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब यांसारखी चार-सहा राज्ये वगळता कोरोनाचे संकट बरेच आटोक्यात आले आहे. जगभरातील शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोनाला प्रतिबंध करणारी लस शोधून काढली तीदेखील याच वर्षभरात. त्या दृष्टीने पाहिल्यास हे वर्ष मानवी इतिहासातील एक महत्त्वाचे वर्ष मानावे लागेल. अत्यंत कमी वेळात कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामी भारतीय संशोधक आघाडीवर होते याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. गेल्या वर्षभरात या महाभयानक साथीमध्ये आपल्या देशाने दीड लाखाहून अधिक नागरिक गमावले. सुमारे एक कोटीच्या वर नागरिकांना कोरोनाची लागण झाली, तरीही भारतीय समाज डगमगला नाही. जनता कर्फ्यूला सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 101 रुग्ण होते. वर्षपूर्तीच्या दिवशी हा आकडा दोन लाखांच्या वर आहे. आपल्या देशात राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम सध्या राबवली जात आहे. महाराष्ट्रातदेखील लसींच्या कुप्या कमी पडणार नाहीत याची दक्षता केंद्रीय आरोग्य यंत्रणा घेत आहे. असे असतानाही महाराष्ट्रात कोविड केंद्र आणि इस्पितळे पुन्हा गजबजू लागली आहेत, तसेच लसीकरणाचा वेगदेखील अपेक्षेप्रमाणे नाही. कोरोनाशी लढण्यामध्ये राज्य सरकारला काडीचाही रस उरलेला नाही हेच यातून सिद्ध होते. महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाचा विषय मागे पडला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोजण्याऐवजी खंडणीवसुलीचे 100-100 कोटींचे आकडे अधिक गाजू लागले आहेत. काहीही करून बळकावलेली खुर्ची वाचवायची आणि उरलेल्या वेळेत खंडण्या गोळा करायच्या असा एकंदर मामला आहे. जेथे सरकारलाच आपल्या रयतेची पर्वा उरली नसेल तेथे संकटापेक्षा वेगळे काय वाट्याला येणार? अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण आणि खुर्ची-खंडणीचे खेळ ताबडतोब थांबवून राज्य सरकारने पुन्हा एकदा सज्ज होऊन कोरोनाशी दुसरी लढाई लढायला हवी हाच वर्षपूर्तीचा धडा आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply