Breaking News

शेअर बाजाराने दिली मंदीतील संधी!

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार का घाबरतात याचा एक अंक गेल्या आठवड्यात पाहायला मिळाला. शेअर बाजार तीन दिवसांत पाच टक्के कोसळला. अशा वेळी चांगल्या कंपन्यांचे तसेच सुरक्षित शेअर आपल्या पोर्टफोलिओत जमा करतात, ते शेअर बाजाराच्या गुंतवणुकीत यशस्वी होतात. कारण शुक्रवारी बाजार पुन्हा वाढल्याचे आपण पाहिलेच आहे.

केवळ एकच महिन्यापूर्वी सर्वोच्च पातळी नोंदवणारा बाजार तेथपासून आज 5 टक्क्यांहून अधिक खाली आलाय. इथं अमेरिकन नॅसडॅक या निर्देशांकाशी तुलना केल्यास आपल्या निर्देशांकात केवळ 5 टक्केच घसरण झालीय, तर नॅसडॅक निर्देशांक आपल्या उच्चांकापासून 11 टक्के खाली आलाय. महामारीच्या पुन्हा वाढत्या रुग्णसंख्येमुळे मागील मार्च महिन्याची पुनरावृत्ती होईल का, अशी लोकांच्या मनात भीती वाटत आहे. बाजार तेजीच्या लाटेवर असताना मागील पाच-सहा प्राथमिक समभाग विक्रीस उदंड प्रतिसाद मिळाला आणि नोंदणीदेखील उत्तम झालेली आपण पाहिली, परंतु जसजसा बाजार पडायला लागला व इतर गोष्टींविषयीचा बाऊ होऊ लागला त्याचा परिणाम नुकत्याच आलेल्या आयपीओच्या कामगिरीवर दिसला. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक व कल्याण ज्वेलर्स यांच्या शेअर्सची नोंदणी आयपीओ किंमतपट्ट्याच्या खाली झाली.

भारतीय बाजारातील रोजचे चढ-उतार (वध-घट) म्हणजेच र्ीेंश्ररींळश्रळीूं ही व्होलॅटिलिटी इंडेक्स याद्वारे मोजली जाते. मागील वर्षी सप्टेंबरपासून जानेवारीपर्यंत ही 14 ते 24 यामध्ये दोलायमान होती, परंतु मागील महिन्यापासून याची न्यूनतम सरासरी 14वरून 19 झालीय, तर उच्चांक 30 नोंदवलाय. म्हणजेच बाजारातील चलबिचलता वाढलेली आहे. म्हणजे खरंतर ट्रेडर्ससाठी हे मार्केट धोकादायक ठरत आहे.

ऐतिहासिक पुरावे असे सूचित करतात की शेअर बाजार दीर्घ मुदतीत सर्वोत्तम परतावा देतो,  परंतु नक्कीच अशा अस्थिर स्टॉक मार्केटची भीती अनेकांना इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापासून दूर ठेवत असते. आपल्या गुंतवणुकीवर शेअर बाजारातील संभाव्य अस्थिरतेच्या परिणामाबद्दल आपल्याला काळजी वाटत असल्यास अस्थिरतेचा धोका कमी करण्याचा सर्वांच्या परिचयाचा एक मार्ग म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजनेच्या (एसआयपी) माध्यमातून बाजारात गुंतवणूक करणं. यासाठी आपण म्युच्युअल फंडातील इक्विटीमध्ये गुंतवणूक असणार्‍या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. यासाठी दरमहा आपण अगदी कमीत कमी 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. जरी शेअर बाजार हा नफ्याची हमी देत नाही तरी अशा एसआयपी या बाजाराबद्दल अंदाज बांधून मग गुंतवणूक करणं असल्या बाबतीस फाटा देतात. कारण बाजाराचा तळ व शिखर याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतशीर गुंतवणूक योजना ह्या आपल्याला बाजारात प्रत्येक ठरावीक अंतराने निरनिराळ्या प्रकारे भाग घेण्यास मदत करतात. जे गुंतवणूकदार बाजारामध्ये भावनिकतेने जास्त लक्ष देतात ते शेअरचा बाजारभाव खाली असताना तो अजून खाली येईल या भीतीपोटी खरेदी करू शकत नाहीत आणि खरेदीची संधी गमावू शकतात. एसआयपी गुंतवणुकीची प्रक्रिया नियमबद्ध असल्याने ती भावनेस थारा देत नाही. त्याचा परिणाम म्हणजे अशी संधी दवडली जात नाही.

दुसरा प्रकार म्हणजे बचावात्मक कंपन्यांच्या शेअर्समध्ये अशा वेळेस गुंतवणूक करणे. कारण अर्थव्यवस्थेत मंदीच्या वेळी किंवा बाजारातील अस्थिरतेपासून प्रत्येक गुंतवणूकदारास त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्याची इच्छा असते. अशा वेळी आपल्यास बाजारात बचावात्मक पवित्रा घेऊन तशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे हितावह ठरू शकते.

बचावात्मक शेअर्स : म्हणजे ज्या शेअर्सच्या भावांमध्ये तुलनात्मक कमी चढ-उतार असतात आणि हे शेअर्स लाभांशच्या रूपात स्थिर परतावा देतात. या कंपन्यांच्या उत्पादनांच्या सतत आवश्यकतेमुळे यांच्या उत्पादनाची मागणी स्थिर असल्याने व्यवसाय चक्रांच्या विविध टप्प्यांमध्ये बचावात्मक शेअर्स स्थिर राहतात. अशा शेअर्सच्या कंपन्या अशी उत्पादने तयार करतात की त्यांच्यावर आर्थिक परिस्थितीचा फारसा परिणाम होत नाही आणि ज्याची मागणीदेखील कायम असेल. उदाहरणार्थ पर्सनल केअर, उपयोगिता, आरोग्य सेवा, एफएमसीजी इत्यादी म्हणजेच ज्यांच्या विक्रीवर बाजारातील घडामोडीचा मोठा परिणाम होत नाही. अशा शेअर्सचा फायदा म्हणजे बाजारात मंदी असतानादेखील हे शेअर्स नियमित परतावा देतात. बाजारात अपेक्षित घट येताच सर्वोत्तम बचावात्मक समभागांमध्ये गुंतवणूकदारांचा कल असतो कारण हे अस्थिरतेविरुद्ध सकारात्मकतेने कार्य करतात. तर अशा बचावात्मक कंपन्या कोणत्या?

उपयोगिता : जीवनावश्यक उपयोगाच्या गोष्टी म्हणजे पाणी, स्वयंपाकाचा गॅस, इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे अशा सेवा देणार्‍या कंपन्यांची मागणी स्थिर राहते. (उदा. टाटा पॉवर, अडाणी पॉवर, एनटीपीसी, गेल, बीपीसीएल, इ.)

ग्राहकाभिमुख गोष्टी (staples) :

ग्राहक वस्तूंचे उत्पादन किंवा वितरण करणार्‍या कंपन्या सहसा या श्रेणीत येतात. दररोज वापरण्यासाठी लागणार्‍या वस्तू असल्याने यांची मागणी स्थिर राहते आणि आणीबाणीच्या परिस्थितीत ती उलटपक्षी कदाचित वाढू शकते याचमुळे अशा कंपन्यांचा कॅशफ्लो प्रत्येक परिस्थितीत निश्चित असा असतो. (उदा. डी मार्ट, टाटा कन्झ्युमर, हिंद युनीलिव्हर, आयटीसी, इ.)

औषध कंपन्या आणि वैद्यकीय उपकरणे (हेल्थ केअर) :

प्रमुख औषध कंपन्या आणि वैद्यकीय उपकरणे यांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांना बचावात्मक समजता येते. कारण आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून वैद्यकीय सहाय्य आवश्यक असते, परंतु आता नवीन ब्रांडेड व जेनेरिक औषधांच्या स्पर्धेत वाढ झाल्यामुळे असे शेअर्स कमी बचावात्मक बनले आहेत. (उदा. अपोलो हॉस्पिटल, डॉलाल पॅथलॅब, डॉ. रेड्डी, इ.).सध्याच्या पडत्या बाजारात अशा कंपन्यांबरोबरच ब्लूचिप कंपन्या गोळा करणे दूरदृष्टीपणाचे लक्षण ठरू शकते.

सुपर शेअर : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स

मागील आठवड्यात श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीच्या बोर्डने या वर्षातील दुसरा अंतरिम लाभांश रु. 6 प्रतिशेअर जाहीर केला. गेल्या ऑक्टोबरमध्येदेखील कंपनीने प्रतिशेअर 6 रु. लाभांश आपल्या गुंतवणूकदारांना दिलेला होता. जरी याचा परतावा (यील्ड) अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असला तरी गुंतवणूकदारांनी या शेअरची खरेदी केल्यामुळे हा शेअर मागील आठवड्यात सुमारे सात टक्के वधारलेला दिसला. या लाभांशासाठी 6 एप्रिल ही रेकॉर्ड डेट आहे. 1979मध्ये एक एनबीएफसी म्हणून स्थापन झालेली ही कंपनी प्रामुख्याने दुर्लक्षित अशा ट्रकचालकांना कर्जपुरवठा करते. याचबरोबर ट्रॅक्टर्ससाठी, शेतीच्या औजारांसाठी, बांधकाम साहित्यासाठी तसेच खेळत्या भांडवलासाठी म्हणजेच इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्यासाठी, टोल व कर भरण्यासाठीदेखील कर्ज पुरवते. याचबरोबर कंपनी जीवन विमा या क्षेत्रातदेखील कार्यरत आहे. अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत होत असल्याने या शेअरने मागील वर्षभरात चांगली कामगिरी केलेली आढळून येते. यामध्ये दीर्घावधीसाठी पुन्हा 1700 रुपयांचे लक्ष ठेवता येऊ शकते.

प्रसाद ल. भावे

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply