ना टँकर पोहचत, ना पाणीयोजना कार्यान्वित; तीन महिन्यांपासून जीव धोक्यात घालून आणावे लागते पाणी
खालापूर : अरुण नलावडे
तालुक्यातील हाळ आदिवासीवाडीतील महिलांना गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. महामार्गावरील वाहनांच्या धडकेची पर्वा न करता या वाडीतील आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागते.
रायगड जिल्ह्यात कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या खालापूरपासून हाकेच्या अंतरावर असणार्या हाळ आदिवासीवाडीतील महिलांना महामार्ग ओलांडून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
हाळ गावात राष्ट्रीय स्वजलधारा योजनेंतर्गत एक कोटी 10 लाख खर्चाची व जलजीवन योजनेंतर्गत 45 लाख खर्चाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांतील इंधन विहिरींना पाणी नसल्याचे सांगत खालापूर पंचायत समिती टँकरने पाणीपुरवठा करत आहे. मात्र हाळ आदिवासीवाडीतील महिलांना मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून खासगी मालकाच्या मेहरबानीखाली दबून विहिरीचे पाणी आणावे लागत आहे.
पाणी योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी वापरून ग्रामस्थांना पाणी मिळत नसेल तर या योजनांचे पैसे गेले कुठे? ग्रामपंचायत योजनांचे काय झाले? असे प्रश्न उपस्थित करून हाळ ग्रामस्थ शफीक मांडलेकर यांनी, लोकांना पाणी मिळत नसेल तर या पाणी योजनांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
याबाबत हाळ ग्रामसेविका स्वप्नाली पोळ यांना विचारणा केली असता, हाळ गावात पाणी आहे, असे उत्तर त्यांनी दिले. हाळ आदिवासीवाडीतील ग्रामस्थ हौस म्हणून जीव धोक्यात घालून पिण्यासाठी पाणी आणतात का? अशी विचारणा केली असता, ‘मी घरी आहे‘, असे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले. दरम्यान, ग्रामसेविका स्वप्नाली पोळ रजा न घेता घरीच राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे खालापूरचे प्रभारी गटविकास अधिकारी माधव शिंदे यांनी सांगितले.
हाळ गावात खालापूर पंचायत समिती टँकरने पाणी पुरवठा करते मात्र हाळ आदिवासीवाडीचा रस्ता अरुंद असल्याने तेथे मोठा टँकर जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लहान टँकरची मागणी केली आहे. मात्र तो अद्याप आला नसल्याने हाळ आदिवासीवाडीला पाणीपुरवठा करता येत नाही.
-माधव शिंदे, प्रभारी गटविकास अधिकारी, खालापूर