नागोठणे परिसरात आढळले 18 रुग्ण
नागोठणे : प्रतिनिधी
मागील 24 तासात शहरासह विभागात कोरोनाचे 18 रुग्ण वाढले आहेत. नागरिक कोरोनाच्या नियमांचे अद्यापही पालन करीत नसल्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी केले आहे.
नागोठणे शहरात 1 एप्रिलपर्यंत फक्त 19 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र 2 एप्रिलच्या सकाळपासून रुग्णाची संख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली असून, शनिवार (दि. 3) सकाळपर्यंत चोवीस तासात 18 रुग्ण वाढले आहेत. यात नागोठण्यात सहा, वरवठणेत नऊ आणि कानसई येथील तीन रुग्ण आहेत. त्यात एका तीन महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे. या 37 रुग्णांपैकी बाराजण घरी परतले आहेत. तर कोविड सेंटरमध्ये 20 आणि तिघेजण त्यांच्या घरीच विलगीकरण झाले आहेत. कोविड सेंटरमधील एका रुग्णाची तब्येत ढासळल्याने त्याला अलिबागच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर नागोठणेतील एक बाधित व्यक्ती मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे डॉ. चेतन म्हात्रे यांनी सांगितले.
शहरात मुंबई – गोवा महामार्गावर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करणार्या एका कर्मचार्याला कोरोनाची बाधा झाली असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार हा पेट्रोल पंप दोन दिवस बंद करण्यात आला असल्याचे डॉ. म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत 606 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याबाबतचा अध्यादेश आला नसल्याने 60वर्षांवरील नागरिकांनाच आठवड्यातून तीन दिवस लस दिली जात आहे.
-डॉ. चेतन म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागोठणे
रोह्यात रुग्ण वाढले
रोहे ः प्रतिनिधी
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने रोहेकरांची चिंता वाढली आहे. तालुक्यात शुक्रवारी (दि. 2) कोरोनाचे तब्बल 23 रुग्ण आढळले. त्यामुळे आता रोहेकरांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
रोहा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग एकेरी संख्येवरून दुहेरी संख्येवर पोहचला आहे. शुक्रवारी तब्बल 23 रुग्ण आढळून आल्याने रोहा तालुक्यात आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या 2751 वर पोचली आहे. शुक्रवारी दोन व्यक्तींनी कोरोनावर मात केली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनामुळे 93 व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहे. सध्या तालुक्यात 62 सक्रीय कोरोना रूग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
पालीतील एकूण रुग्णसंख्या 500च्या वर
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा आता 500 च्या वर गेला आहे. शुक्रवारी (दि. 2) कोरोनाचे पाच रुग्ण सापडले आहेत. तर दोन रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली.
सुधागड तालुक्यात सध्या कोरोनाचे 26सक्रिय रुग्ण असून, ते सर्व गृहविलगीकरणमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 506 रुग्ण झाले असून 454 रुग्ण बरे झाले आहेत. आणि 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती डॉ. मढवी यांनी दिली. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. शशिकांत मढवी यांनी केले आहे.
कर्जतमध्ये दुसर्या लाटेत रुग्ण आढळण्याचा विक्रम
कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यात कोरोनाचा जोर कमी – जास्त होत आहे. आज नवीन 29 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. आज सापडलेले रुग्ण म्हणजे दुसर्या लाटेचा विक्रम झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात 2158 रुग्ण सापडले असून 1948 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 78 जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आज कर्जत शहर दहिवली, माथेरान, शिलार, मुद्रे बुद्रुक, भिसेगाव, नेरळ, कुशिवली, मोहिली, पोशिर, किरवली येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.