महाड ः प्रतिनिधी
महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपीला न्यायालयातून नेताना पीडितांनी गाडी अडवून आरोपीला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत घेराव घातला. महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
दुर्घटनेस जबाबदार असलेला बिल्डर फारुक काझीला अटक करण्यात आली. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हा कालावधी पूर्ण झाल्याने त्याला पुन्हा महाड न्यायालयात आणले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या वेळी इमारत दुर्घटनेतील पीडितांनी न्यायालयाच्या आवारात जमून घोषणाबाजी करीत आरोपीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची गाडी अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करीत आरोपीची सुटका केली. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या या आरोपीला जामीन मिळू नये व कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी संतप्त नागरिकांची मागणी आहे.