डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास जन्मापासूनच खडतर आणि वेदनादायी होता. याचा प्रत्यय त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आला. डॉ. आंबेडकरांची आई भीमाबाई प्रचंड हट्टी, बोलकी आणि जिद्दी होती. ’माझी परिस्थिती सुधारेल तेव्हाच मी माहेरी येईन’ असे एकदा तिने माहेरच्या मंडळीना खडसावून सांगितले होते. आईचा हा बाणेदारपणा डॉ. आंबेडकरांमध्ये पुरेपूर उतरलेला पाहायला मिळतो. डॉ. आंबेडकरांचे वडील लष्करात सुभेदार असले तरी ते व्यवसायाने लष्करात शिक्षक होते. डॉ. आंबेडकर हे रामजीचे चौदावे अपत्य. या अपत्याला शाळेतील विद्यार्थ्याकडून आणि खुद्द शिक्षकाकडूनही खूप त्रास झाला. सातार्यात शिक्षण घेत असताना आंबेडकरांनी तेथील बसस्थानकात हमाली केली आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत पोहोचले. मुंबईत परळच्या वस्तीत त्यांनी अभ्यासाची अनेक पारायणे केली. बाबासाहेब मॅट्रीकला असताना, संध्याकाळी अभ्यासाला बसले की पहाटे पाचपर्यत उठत नसत. बाबासाहेब मॅट्रीक परीक्षा पास झाल्यावर त्यांचे गुरुवर्य केळुसकरांनी त्यांना ’मराठी बुध्दचरित्र’ बक्षीस म्हणून दिले होते. बाबासाहेबांचा विवाह रमाईबरोबर मॅट्रीक परीक्षेपूर्वीच झाला होता. पुढे बाबासाहेब मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून बीए झाले. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले. बीए झाल्यावर आंबेडकरांनी बडोदा सरकारकडे काही दिवस नोकरी केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती मंजूर करून त्यांना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. अमेरिकेत असताना बाबासाहेब एक वेळचे जेवण चुकवत आणि शिष्यवृत्तीच्या पैशातून जुनी पुस्तके विकत घेत. शिवाय शिष्यवृत्तीच्या पैशातूनच पत्नीला घरप्रपंचासाठी पैसेही पाठवत. बाबासाहेबांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ’एन्शन्ट इंडियन कॉमर्स’ (प्राचीन भारतातील व्यापार) हा प्रबंध 1915 साली सादर करून एमएची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रबंध ’कास्टस इन इंडिया’ (भारतातील जातीसंस्था) कोलंबिया विद्यापीठात सादर केला. बाबासाहेब म्हणायचे की, जातीसंस्थेमुळेच सर्व भारताचे विघटन झाले. भारत शक्तीहीन आणि दुबळा झाला. बाबासाहेबाचे हे विधान आजच्या भारतालाही तंतोतंत लागू पडते. पुढे बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात तिसरा प्रबंध सादर केला. ’नॅशनल डिव्हीडंट ऑफ इंडिया : ए हिस्टॉरिक अॅन्ड अनॅलिटिकल स्टडी’ (भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक परिशीलन) या तिसर्या प्रबंधाने बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी ही सर्वोच्च पदवी मिळाली. तेव्हापासून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉ. आंबेडकर अमेरिकेत असतानाच पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यावेळी देशभक्त लाला लजपतराय अमेरिकेत होते. त्यांनी डॉ. आंबेडकरांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. आंबेडकरांनी तो मोह जाणीवपूर्वक टाळला. त्यावेळी डॉ. आंबेडकर लाला लजपतराय यांना म्हणाले की, बडोद्याच्या महाराजांना मी जे वचन दिले आहे ते मोडणार नाही, माझा अभ्यासक्रम पूर्ण करूनच मी भारतात परतेन. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, डॉ.आंबेडकर प्रखर तत्वनिष्ठ होते. पुढे डॉ. आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पोलिटिकल सायन्स या महाविद्यालयातून त्यांनी डीएस्सीची पदवी संपादन केली. या दरम्यान त्यांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपली. त्यामुळे त्यांना परत बडोद्याला यावे लागले. बडोद्यात त्यांनी कराराप्रमाणे नोकरी धरली. पण परत त्यांच्या वाट्याला पूर्वीचेच दिवस आले. शेवटी डॉ. आंबेडकरांनी बडोदा सोडले आणि ते मुंबईला आले. मुंबईत त्यांनी ’स्टॉक्स अॅन्ड शेअर्स‘ नावाची एक कंपनी काढली. दरम्यानच्या काळात त्यांनी बर्ट्राड रसेल यांचा ’प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ (सामाजिक पुनर्रचनेची तत्वे) हा ग्रंथ वाचून, हे जग आपण बुध्दीच्या सामर्थ्याने, वैभवाने जिंकायचे असे ठरवले. डॉ. आंबेडकर सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना माँटेग्यू चेमस्फर्ड सुधारणा समिती भारतात निरनिराळ्या जातीच्या मताधिकाराची चौकशी करण्यासाठी आली होती, त्यावेळी डॉ. आंबेडकर चौकशी समितीला म्हणाले की, स्वराज्य हा जसा ब्राह्मणाचा हक्क आहे, तसाच तो महारांचाही आहे. ही गोष्ट कोणीही मान्य करेन. प्राध्यापकी करणे हे डॉ. आंबेडकरांचे अंतिम ध्येय्य नव्हते. तर अस्पृश्यतेचा कलंक धुवून त्यांना मानाचं जिणं प्राप्त करून देणे हे त्यांचं ध्येय्य आणि स्वप्न होतं. डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यता निवारणाच्या कामात राजर्षी शाहूचे आर्थिक सहाय्य खूप मिळाले. त्याच जोरावर त्यांनी ’मूकनायक’ नावाचे पाक्षिक काढले. डॉ.आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या लोकशाही मूल्याला केंद्रस्थानी ठेवून भारतीय राज्यघटना (1950) अस्तित्वात आणली. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मानवी हक्कांची, कल्याणाची आणि सुरक्षिततेची हमी दिली. डॉ. आंबेडकरांच्या हातून निर्माण झालेले ’ भारतीय संविधान ’ हे त्यांच्या अस्पृश्यता विरोधी लढ्याला मिळालेले मोठं यश आहे. भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीयाचा प्राण आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने जपले पाहिजे. यातच उद्याच्या भारताचे हित आणि कल्याण आहे. डॉ. आंबेडकरांच्या या खडतर लढ्यास मनापासून सलाम. आज डॉ. आंबेडकरांची 130वी जयंती आहे. त्यानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन.
-डॉ. ए. यू. सरवदे
वीर वाजेकर कॉलेज, फुंडे-उरण (मो. क्र. 9987291451)