माणगाव पत्रकार संघ, आविष्कार फाऊंडेशनकडून माणुसकीचे दर्शन
माणगाव : प्रतिनिधी
कोविड संकटात योद्ध्यासारखे रस्त्यावर काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना माणगाव तालुका पत्रकार संघ व आविष्कार फाऊंडेशन तर्फे रविवारी (दि. 18) सकाळी अल्पोपहार व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
कोविडच्या वाढत्या संसर्गामध्ये पोलीस, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक, आशाताई, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते योद्ध्यासारखे काम करीत आहेत. पोलीस कर्मचारी तर ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर तासनतास उभे राहून ते जनतेला कोविड संकटात हिताच्या सूचना देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून माणगाव तालुका पत्रकार संघ व आविष्कार फाऊंडेशनने त्यांना रविवारी सकाळी अल्पोपहार व पाणी बॉटलचे वाटप केले. या वेळी प्रसिद्ध उद्योजक विजय मेथा, दिनेश मेथा, दिलीप जाधव, ज्येष्ठ पत्रकार मजिद हाजिते, प्रभाकर मसुरे, सचिन देसाई, फाऊंडेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे, प्रा. हर्षल जोशी, राहुल दसवते, नंदुराज वाढवळ, पोलीस, वाहतूक पोलीस, महिला पोलीस आदी उपस्थित होते.