संकटाच्या काळात विवेकी विचार करण्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होते. आज त्याचीच गरज आहे. आजच्या संकटात भावनिक चर्चांमधून भीती, संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत, कारण त्यामागील अर्थकारणाचा विचार केला जात नाही. तो जर विवेकाने केला तर घटनांकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहता येते आणि त्यांचा स्वीकार करणेही सोपे जाते.
सध्या जेवढी चर्चा औषधे आणि लसींची सुरू आहे, तेव्हढी आपल्या देशात गेली अनेक दशके झालेली आठवत नाही. कोरोनाची ही साथच इतकी अभूतपूर्व आहे की अनेक गोष्टी जगात प्रथमच होत आहेत. त्यामुळे भीती, संभ्रम आणि त्यातून आरोप प्रत्यारोप ही दररोजची गोष्ट झाली आहे. खरे म्हणजे हा काळ मन शांत ठेवण्याचा आहे, पण आजूबाजूच्या असुरक्षित परिस्थितीमुळे अनेकांचे मन अस्थिर होत असून त्यातून हे सर्व होते आहे, पण असेच चालू ठेवणे, हे जसे त्या त्या व्यक्तीला परवडणारे नाही, तसेच समाजालाही परवडणारे नाही. त्यामुळे या संकटाचा मुकाबला करताना विवेकाचे जागरण केले पाहिजे.
* जग थांबलेले नाही
समाजाच्या आरोग्याची आणि आर्थिक स्थिती सध्या आव्हानात्मक झाली आहे, पण म्हणून सर्व जग थांबले आहे असा समज करून घेता कामा नये. ही स्थिती सुधारावी, शक्य असतील तेवढे व्यवहार चालू राहावेत, यासाठी आपल्याच आजूबाजूचे नागरिक धडपड करत आहेत. आपण ज्यांना कोरोना योद्धे म्हणतो, त्याच्याही पलिकडे असे अनेक समूह काम करत आहेत म्हणून या संकटावर आपण मात करू, अशी भाषा आपण करू शकतो. शेतात शेतकरी राबतो आहे, म्हणून भाजीपाल्याचा आणि अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होतो आहे. सर्व जीवनावश्यक गोष्टींची वाहतूक करणारी माणसे कामे करत आहेत. किराणा आणि औषध दुकानाचे चालक कोरोनाची जोखीम स्वीकारून सेवा देत आहेत. रिक्षाचालक, बसचालक काम करत आहेत. समाजातील असे अनेक घटक शक्य असेल तो आपला वाटा उचलताना दिसत आहेत. ते सर्वच जण केवळ आर्थिक फायद्यासाठीच काम करत आहेत, असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. अर्थात, यात होणारा आर्थिक व्यवहार तेवढाच महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तो पूर्णपणे काढून टाकला तर अशा आव्हानात्मक काळातही समाजजीवन चालू शकणार नाही.
* पचायला जड, पण वस्तुस्थिती
कोरोना साथीने अनेकांना आर्थिकदृष्ट्या हतबल केले असताना काही जणांना मात्र आर्थिक उन्नतीची संधी दिली आहे. लाखो लोक संकटात असताना आणि हजारो नागरिकांचा मृत्यू होत असताना काही जणांचा आर्थिक फायदा कसा होऊ शकतो, असा भावनिक विचार करण्याचा आपल्याला अधिकार निश्चित आहे. पण जग भावनेवर नव्हे तर व्यवहारावर जास्त चालते. लसीची निर्मिती करणार्या कंपन्या, कोरोना झालेल्यांवर उपचार करणारी रुग्णालये, त्यांना लागणार्या औषधांचे उत्पादन करणार्या कंपन्या अशा काही समूहांना भरपूर काम मिळाले असून त्यात त्यांचा चांगलाच आर्थिक फायदा होतो आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराचे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांना समोर ठेवून अंत्यसंस्काराची सर्व तयारी करणारा व्यवसायही हैद्राबादमध्ये सुरू झाला आहे. असा व्यवसाय करणारे संकटाचे रुपांतर संधीत करतात, असे व्यवहारी जगात म्हटले जाते. हे पचायला जड असले तरी अशा सेवा आता विकत घ्याव्या लागतील, हे आता स्वीकारावे लागणार आहे.
* रुग्णालये आणि औषध क्षेत्राला भरते
गुंतवणुकीचे आणि शेअर बाजाराचे जगही असेच व्यवहारी आहे. तेथे काय होते आहे, पहा. तेथे इतर सर्व क्षेत्रांचे काय होणार, त्या त्या क्षेत्रात नफे घटणार, अशी भीती व्यक्त केली जात असताना रुग्णालये आणि औषध क्षेत्राला भरते आले आहे. रुग्णालये भरून वहात आहेत आणि रुग्णांना विशिष्ट औषधे कमी पडत आहेत, याचा अर्थ या सेवांचा आणि उत्पादनांचा विस्तार केला पाहिजे, हे ओघाने आलेच. तो करायचा तर त्यासाठी भांडवली गुंतवणूक करणे आले. म्हणजे ती करण्यासाठी नफा मिळविण्याची अपरिहार्यताही आली. तो आपल्यालाच कसा जास्त मिळेल, याचा विचारही त्यासोबत आलाच. औषधी कंपन्यांना किती मोठी संधी आली आहे, असे मानून त्या कंपन्यांच्या शेअरचे भाव दररोज वाढत आहेत. एकीकडे कोरोना साथीमुळे अडचणीत सापडलेली माणसे आणि दुसरीकडे त्या अडचणीचे संधीत रुपांतर करून उत्पादन करणार्या कंपन्या, आणि केवळ कंपन्याच नव्हे तर शेअर बाजाराच्या माध्यमातून त्यातून गुंतवणुकीला परतावा मिळविणारी माणसे. हे सर्व एकाच वेळी चालू आहे आणि त्यालाच व्यवहाराचे वर्तुळ पूर्ण झाले, असे म्हटले जाते, कारण त्याशिवाय दुसरा पर्याय समोर नसतो. अर्थात, त्यात जर अतिरेकी नफेखोरी कोणी करत असेल तर त्यावर सरकारी यंत्रणेने लक्ष ठेवायचे असते, हे ओघाने आलेच.
* आर्थिक गुंतवणुकीची अपरिहार्यता
या व्यवहाराला आणि त्यावर उभ्या राहणार्या अर्थकारणाला नफेखोरीचे नाव आपण देऊ शकतो, हे जेवढे खरे आहे, तेवढेच हेही खरे आहे की याकाळात आरोग्याची आणि आर्थिक जोखीम घेऊन उत्पादन करणारी माणसे समाजात असावीच लागतात. त्याचे एक उदाहरण आपण पाहूयात. रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोनाची लस आणि ऑक्सिजनची गरज गेल्या काही दिवसांत कशी वाढत गेली, हे आपण पाहत आहोत. या तिन्हीही गोष्टींच्या उत्पादन आणि वितरणासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. ती करूनही सध्या त्यांची कमतरता भासते आहे. त्याचे कारण अचानक वाढलेली मागणी. ती लगेच पूर्ण होण्याची शक्यता नसते, कारण त्यासंबंधीचे आर्थिक वर्तुळ पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती व्यवस्था उभी राहत नाही. अशा कंपन्यांना सरकारने पतपुरवठ्याच्या मार्गाने आर्थिक मदत दिली त्याचे कारण हे आहे.
* वादविवाद गैरलागू
सरकारी नियमांचे पालन करून अशा जीवनावश्यक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री केली जात असेल तर त्यांच्या किमती विषयींचे वादविवाद अशावेळी गैरलागू ठरतात. त्याच्या किमती आम्ही म्हणू तेवढ्याच ठेवल्या पाहिजेत, असा दुराग्रह केल्याने तात्पुरते वाद तेवढे उभे राहतात, मात्र त्यातून साध्य काही होत नाही. काही साध्य होण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे वर्तुळ पूर्ण होणे, हे केवळ महत्त्वाचेच नव्हे तर अपरिहार्य असते. ते जोपर्यंत होत राहील, तोपर्यंत या संकटात संधी शोधली जाईल आणि त्याचा फायदा घेणारे नागरिक आपल्याच आजूबाजूला असतील. भावनिक आवेगातून बाहेर पडून ही अपरिहार्यता आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे.
* औषध क्षेत्र आणि भारत
भारताची 137 कोटी लोकसंख्या लक्षात घेता अन्न सुरक्षिततेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आरोग्य सुविधा आणि औषधांना आहे, याची प्रचिती कोरोना संकटात आपण घेत आहोत. जेनेरिक औषधांच्या उत्पादनात भारत जगासाठी सर्वांत मोठा पुरवठादार देश आहे. कोरोनावरील लसीसंदर्भातही तीच स्थिती आहे. त्यामुळे याचा फायदा भारतीय औषध उद्योग घेत असून 2019-20 मध्ये भारताने 16.3 अब्ज डॉलर किंमतीची औषधे निर्यात केली. कोरोनाच्या काळात त्यात मोठी वाढ होते आहे. अमेरिकेसारख्या देशात भारतीय औषध कंपन्यांना मोठी मान्यता आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत या उद्योगात 100 अब्ज डॉलरची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत या क्षेत्रासाठी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यामुळे परकीय गुंतवणूकदारही त्याकडे आकर्षित झाले आहेत. भारतीय शेअर बाजारात फार्मा क्षेत्राचा इंडेक्स गेल्या सहा महिन्यांत 19 हजारांवरून तब्बल 24 हजारांवर गेला आहे!
-यमाजी मालकर
ymalkar@gmail.com