Breaking News

एक तांत्रिक बदल करी गुंतवणूकदारांना आकर्षित!

कोरोनाचे संकट आणि इतर काही कारणांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांची संख्या गेल्या एका वर्षात विक्रमी वाढली आहे. आता एका तांत्रिक कारणाने त्यात आणखी भर पडते आहे. या बदलामुळे देशी आणि विदेशी नवे गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे आकर्षित होत आहेत. अशा एका महत्त्वाच्या तांत्रिक बदलाविषयी.

मागील एप्रिलपासून या वर्षी जानेवारीपर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार एक कोटी सात लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत, म्हणजेच एका वर्षात बाजारात अगदी नव्यानं आलेल्या किंवा येणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. आता हा येणारा गुंतवणूकदार वर्ग बहुतांशी नवा वर्ग असू शकतो. नवीन तरुण वर्ग, शहराबाहेरून शहराकडं आलेला ग्रामीण-निमग्रामीण वर्ग जास्त करून बाजारामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहे, कोणी थेट तर कोणी म्युच्यअल फंडांच्या माध्यमातून. अजून एक गुंतवणूकदार वर्ग असा आहे की, ज्यांनी आतापर्यंत ’शेअरबाजारात गुंतवणूक’ याबाबत विशेष रूची दाखवली नव्हती, असादेखील वर्ग या मागील न भूतो न भविष्यती अशा या वर्षात बाजाराकडं आपसूकच खेचला गेलाय. तर असो, जितके स्वदेशी गुंतवणूकदार आपल्या बाजारामध्ये जास्त संख्येत, जास्त प्रमाणात गुंतवणूक करतील तितका आपला बाजार स्वावलंबी होऊ शकेल आणि त्यामुळं ही बाब स्वागतार्हच आहे.

ज्याप्रमाणं, कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची गरज, गुणवत्ता, टिकाऊपणा, उपयोगिता, रंग-रूप असे अनेक निकष आपण त्या वस्तूची योग्यप्रकारे करण्यासाठी तपासत असतो. त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाची गोष्ट आपण तपासत असतो, ती म्हणजे त्या वस्तूचं मूल्य. जे योग्यपणे जोखण्यासाठी आपण वरील गोष्टी तपासताना आढळून येतो. अगदी हीच गोष्ट बाजारात येणारा गुंतवणूकदार करत असतो. अगदी इथं कोणत्या कंपनीचा शेअर घेण्यासाठी प्रचंड अभ्यास कमी पडतो, परंतु जर ढोबळमानानं बाजाराकडं पाहिल्यास बाजार महाग आहे की स्वस्त, ही सर्वांत मोठी बाब असते बाजारात गुंतवणूक करताना. अगदीच ढोबळमानानं या गोष्टीचा अंदाज बांधायचा झाल्यास आपसूकच सर्वांत सहज गोष्ट तपासली जाते ती म्हणजे पी/ई गुणोत्तर. किंमत कमाई (पी / ई) गुणोत्तर सर्वांत जास्त वापरले जाणारे मूल्य निर्देशकांपैकी एक आहे आणि गुंतवणूकदार गुंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणात याचा आधार घेतात. या गुणोत्तराची गणना बाजारभावाची किंमत व प्रति शेअरच्या कमाईस विभागून केली जाते. म्हणजेच एक (एककाची कमाई) रुपया कमावण्यासाठी आपण किती किंमत मोजत आहोत.. मग तो कोणताही शेअर असो किंवा अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी बनलेला निर्देशांक असो.

मागील महिन्यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजार (निफ्टी) यांनी आपल्या धोरणात काही बदल केले आणि जे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे म्हणून आजचा हा लेख. गेल्या महिन्यातील हे काही तांत्रिक बदल आपल्या गुंतवणूकदारांच्या पथ्यावरच पडणार आहेत, तर आजच्या लेखात आपण यावर बोलू.

31 मार्च 2021 रोजी निफ्टी 50चं मूल्य साधारणपणे 17 टक्क्यांनी कमी झालंय आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे निफ्टी 50 निर्देशांक आपल्या उच्चांकावरून केवळ पाऊणे पाच टक्केच खाली आलेला असताना हा बदल झालाय. आता ही गोष्ट संपूर्ण देशासाठी, खासकरून गुंतवणूक क्षेत्रासाठी किती महत्त्वाची आहे हे आपण पाहुयात. निफ्टी 50 हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा

निर्देशांक असून सर्व आर्थिक जगतात एक सर्वांत महत्त्वाचा, प्रमुख आणि प्रचलित मापदंड निर्देशांक म्हणजेच बेंचमार्क इंडेक्स म्हणून ओळखला व मानला जातो. अनेक वित्तीय उत्पादनांच्या तुलनेसाठी व संपूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्येदेखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी मोठी जबाबदारी या एक्सचेंजकडं असल्यानं याचं निर्देशांक मूल्य (रोजचे खाली-वर होणारे अंश हे त्यामधील 50 कंपन्यांच्या फ्री-फ्लोट बाजारमूल्यानुसार वर-खाली होत असतात. फ्री फ्लोट म्हणजे केवळ बाजारात व्यवहारासाठी उपलब्ध असणारे शेअर्स) अंशदेखील रोजच्या रोज गणिलं जातं आणि ज्याचे आकडे कंपनीच्या वेबसाईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतात. 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय शेअरबाजारानं उघडपणे जाहीर केलं की, 31 मार्चपासून निर्देशांक व्यवस्थापन पद्धतीत (इंडेक्स मॅनेजमेंट मेथडॉलॉजी) बदल होत आहेत. यापुढं ही पद्धत अवलंबताना निफ्टी 50 मधील कंपन्यांची उत्पन्न एकत्रितपणे (लेपीेश्रळवरींश शरीपळपसी) विचारात घेतली जातील, ना की आधीच्या पद्धतीप्रमाणं निव्वळ त्याच कंपनीचे (स्टँडअलोन) आर्थिक आकडे (उत्पन्न/नफा, इ.)  त्यामुळं आता नवीन मोजमापकानुसार एकूण फ्री फ्लोट बाजारमूल्यास शेवटच्या चार तिमाहींमधील करपश्चात नफ्याच्या आकड्यांनी भागलं जाईल.

ही सगळी माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्यानं त्याच्या खोलात न जात पाहुयात कन्सॉलिडिटेड व स्टॅन्डअलोन यामध्ये नेमका काय फरक आहे. एकत्रितपणे म्हणजे कंपनीच्या असलेल्या, मात्र बाजारामध्ये नोंदणीकृत नसलेल्या सर्व कंपन्यांचा लेखाजोखा यामध्ये विचारात घेतला जाईल. उदा. द्यायचे झाल्यास आपण मोठमोठ्या समूहाच्या अशा अनेक कंपन्या बघतो-ऐकतो, टाटा मोटर्सची जॅग्वार-लँडरोव्हर, रिलायन्स समूहाच्या रिलायन्स जियो, रिलायन्स रिटेल अशा कंपन्या ज्या बाजारामध्ये नोंदणीकृत नाहीयेत, परंतु समूहाच्या एकूण उत्पन्नावर व पर्यायानं त्या समूहावर परिणाम करत असतात. डीएसपी कंपनीनं केलेल्या आपल्या या बाबतीतील सर्वेक्षणात म्हटलं गेलंय की, निफ्टी 50 मधील 39 (म्हणजेच 78 टक्के) कंपन्यांची एकत्रित उत्पन्नं (कन्सॉलिडिटेड) ही त्या कंपनीपुरतीच मर्यादित (स्टॅन्डअलोन) उत्पन्नांपेक्षा जास्त आहेत. याचाच अर्थ नवीन गणकानुसार कंपन्यांची उत्पन्नं ही वाढलेली दिसून येत आहेत आणि ज्याचं कारण म्हणून निफ्टी 50 चे पी/ई गुणोत्तर हे 20 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे.

याचा थेट परिणाम – निफ्टीचं मूल्य स्वस्त झाल्यानं निर्देशांक या मूल्यावर गुंतवणूकदारांना, मोठ्या दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदारांना, जागतिक मोठ्या वित्तीय संस्थांना, मोठमोठ्या हेज फंडांना हे स्वस्त मूल्य नक्कीच खुणावू शकतं. अगदी आपल्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार जे थेट संपूर्ण इक्विटीमध्ये गुंतवणूक न करता इंडेक्स फंड, बॅलन्स अ‍ॅडव्हान्टेज फंड, डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलॉकेशन फंड, एक्स्चेंज ट्रेडेड फंड यामध्ये गुंतवणूक करणं पसंत करतात त्यांच्यासाठीदेखील ही सर्वांत मोठी गोष्ट ठरू शकते. त्याखेरीज जे गुंतवणूकदार केवळ पी/ई गुणोत्तर पाहूनच आपल्या गुंतवणुकीच्या योजना आखत असतात त्यांच्यासाठीदेखील हा बदल एक मोठा मैलाचा दगड ठरू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दशकानंतर आलेला हा बदल येणार्‍या दशकांसाठी जगाला आपल्या बाजाराकडं पाहण्यास एक गालिचा अंथरून देईल याबाबत माझं तरी दुमत नाहीये, पहा पटतंय का..  

निफ्टीचे मूल्य असे स्वस्त झाले

1 फेब्रुवारी 2021, निफ्टी 50 पी/ई = 38.26

1 मार्च 2021, निफ्टी 50 पी/ई = 40.28

1 एप्रिल 2021, निफ्टी 50 पी/ई = 33.60

22 एप्रिल 2021, निफ्टी 50 पी/ई = 32.07

सुपरशेअर – विप्रो

मागील दशकांतील सर्वांत मोठी वेल्थ क्रिएटर ठरलेली विप्रो कंपनी या आठवड्याची सुपरशेअर ठरली. गेल्या आठवड्यातील जाहीर झालेल्या निकालांनी कंपनीच्या शेअरभावास चार चाँद लावले व आठवड्यातील साडेदहा टक्क्यांच्या वाढीनं आपली

सर्वोच्च भावपातळी नोंदवली. कंपनीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 27.78 टक्के वाढ झाली आहे. माहिती तंत्रज्ञानातील या अग्रणी कंपनीनं गेल्यावर्षी याच काळात 2326 कोटी रुपये नफा कमावला होता तर यावर्षी नफा वाढून 2972.3 कोटी रुपयांवर गेलेला आहे तर उत्पन्न 3.4 टक्क्यांनी वाढून 16,245 कोटी रुपयांवर पोहचलं आहे. त्याजबरोबरीनं विप्रो कंपनी बँकिंग, वित्तसेवा व विमा या क्षेत्रात येण्यासाठी लंडनस्थित कॅपको ह्या कंपनीचं अधिग्रहण करण्याच्या विचारात असून त्याजबरोबरीनं अमेरिकी 117 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करून सुरक्षा सल्लागार सेवा देणारी अजून एक अँपियॉन नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी पुढील तिमाहीमध्ये खरेदी करण्यात रस दाखवत आहे. एकूणच कंपनीचं नाव व ख्याती पाहता पुढील दशकांत पुन्हा संपत्ती बनवण्याच्या उद्देशानं मोठ्या गुंतवणूकदारांचं या कंपनीकडं लक्ष लागून न राहिल्यास नवल.

-प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpfinvest@gmail.com

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply