Breaking News

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर दक्षता; नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या प्रमाणात घट झालेली दिसत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता तिसर्‍या लाटेचा धोका संपलेला नाही हे लक्षात घेऊन कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन कोविड टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ दिलेले नाही. सद्यस्थितीत कोरोना रुग्ण आढळतो अशा इमारतीत, सोसायटी व वसाहतीत सर्वांचे टेस्टींग करण्यात येऊन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार टारगेटेड टेस्टींगवर भर देण्यात येत आहे. दररोज सरासरी सात हजारांहून अधिक नागरिकांची कोविड टेस्टींग करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 22 लक्ष 23 हजार 569 इतक्या कोविड टेस्ट करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शासन निर्देशानुसार आरटी-पीसीआर टेस्ट 60 टक्के आणि न्टिजन टेस्ट 40 टक्के असे टेस्टचे प्रमाण कायम राखले आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे प्रमाणही 30हून अधिक आहे. अशाप्रकारे रुग्णसाखळी खंडीत करण्यासाठी ट्रेसींग, टेस्टींग व ट्रिटमेंट अशा त्रिसूत्रीकडे बारकाईने लक्ष दिल्याने कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि टेस्टींगचे प्रमाण कमी होऊ न देणे व त्याचवेळी जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेऊन लस संरक्षित होण्याकडे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे बारकाईने लक्ष आहे. दिवाळीच्या उत्सवी कालावधीत कोरोना विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात होईल ही शक्यता लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या सुटीच्या कालावधीतही कोविड टेस्टींग सुरू ठेवण्यात आले होते. तसेच नागरिकांची लसीकरणाअभावी गैरसोय होऊ नये यादृष्टीने महापालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्रे कार्यान्वित ठेवण्यात आलेली होती. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेली कोरोना रूग्णसंख्याही 301 इतकी मर्यादीत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी 3504 दिवस म्हणजेच साधारणत: 9.5 वर्षे इतका झालेला असला कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका दक्ष आहे.

लसीकरणालाही वेग

नवी मुंबईकर नागरिक लवकरात लवकर लस संरक्षित व्हावेत यादृष्टीने लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. लसीकरणासाठीही सर्व रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, 2 मॉल मध्ये ड्राईव्ह इन लसीकरण तसेच इएसआय हॉस्पिटल वाशी येथील जम्बो लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. याशिवाय हर घर दस्तक अभियान अंतर्गत नागरिकांच्या घराजवळ जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय वाशी, नेरुळ व घणसोली या रेल्वे स्टेशन्सवर लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. ज्यांचे लसीकरण शिल्लक आहे त्यांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे व लसीकरण झाले असले तरी कोरोना सुरक्षा त्रिसूत्रीचे पालन करावे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई मनपा

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply