कर्जत : प्रतिनिधी
कर्जत नगर परिषद पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ कोरोना विषयक नियमांचे पालन करून ठराविक लोकांच्या उपस्थित करण्यात आला.
कर्जत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धिकरण केंद्राला सुमारे 18-20 वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे या केंद्रात दुरुस्ती व सुधारात्मक कामे करणे गरजेचे होते. त्यापैकी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल कामांच्या दुरुस्तीचा शुभारंभ नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर, गटनेते नितीन सावंत, विरोधी पक्षनेते शरद लाड, नगरसेवक विवेक दांडेकर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, कार्यालय अधीक्षक अरविंद नातू, पाणीपुरवठा अभियंता अशोक भालेराव, आणि ठेकेदार मनीष त्रिवेदी या वेळी उपस्थित होते.
जलशुद्धिकरण केंद्राचा क्लॉरीफॅक्युलेटर ब्रिज गंजला आहे, तो बदलण्यात येणार आहे तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्याठिकाणी 500 केव्ही सेट बसविण्यात येणार आहे. फिल्टर मेडिया (सॅण्ड), जुने ब्लोअर, पॅनेल, मिक्सर बदलणे, संपूर्ण वॉल्व्ह, मिक्सर केबल, पॅनल, लाईट व्यवस्था करणे, तसेच भूमिगत केबल टाकणे अशी सुधारात्मक कामे या जलशुद्धिकरण केंद्रात 14व्या वित्त आयोगातून सुमारे दोन कोटी 45 लाख रुपये खर्च करून करण्यात येणार आहेत. सदरचे काम माना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कंपनी करणार आहे.