10 हजारांहून अधिक वृद्धांचे लसीकरण
उरण : वार्ताहर
उरण परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी, काही सामाजिक संस्था, पोलीस, प्रशासन जीवावर उदार होऊन प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांतून उरण तालुक्यातील 3008 रुग्ण आसपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला रुग्णालयच उपलब्ध नव्हते. यामुळे सध्या कोरोनाबाधित रुग्णांनाही उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्याची वेळ येत होती.कोरोनाबाधित पहिली स्टेज, लो-रिस्क आदी उरणमधील रुग्णांना उरणमध्येच उपचार सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोकडवीरा येथील 47 बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, डॉ. प्रफुल्ल सामंत यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी मोहन जगताप, नोडल ऑफिसर डॉ. स्वाती म्हात्रे, मेडिकल ऑफिसर संयोगी भोईर या कोरोना योद्धा म्हणून काम करणार्या आरोग्य सेवकांचे काम कौतुकास्पद आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय, लो रिस्क रुग्णांचे कॉन्टॅक्ट निश्चित करणे, त्यांना क्वारंटाइन करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम कोविड काळात जीवाची तमा न बाळगता रुग्णांची अखंडपणे तपासणी, समुपदेशन, रुग्णांना धीर देण्याचे काम न थकता हे आरोग्य सेवक अविरतपणे करीत आहेत.
कोरोना काळात उरणमधील काही सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी अविरतपणे सेवा देण्याचे कार्य केले आहे. शहरी-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कॉन्टॅक्ट ट्रेस करणे, हाय, लो रिस्क रुग्णांच्या याद्या तयार करणे त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करणे, स्वॅब टेस्टसाठी आलेल्या रुग्णांना कौन्सिलिंग करणे, त्यांची भीती दूर करणे, वेळप्रसंगी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास स्वताच्या गाडीने, स्वखर्चाने कोविड रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचविण्याचे काम, रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामे जीवाची पर्वा न करता करीत आहेत.
ग्रामीण, शहरी आणि गाव वस्त्यांवर जाऊन कोविड 19चा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणे त्याचप्रमाणे पॉझेटिव्ह रुग्णांकरिता औषधांचे वाटप करणे, तसेच ग्रामपंचायती सरपंच सदस्य यांना प्रात्यक्षिक दाखविणे, त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार आवश्यक साहित्य पुरविणे या कामाचा भारही हे आरोग्य सेवक बिनाभोभाटपणे करीत आहेत.
कोविड 19 प्रादुर्भाव टाळणासाठी आरोग्य मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायजर, फेसशील्ड, आरोग्याची काळजी वाटत असल्यामुळे रुग्णांसाठी ऑक्सीमीटर, इलेक्ट्रॉनिक वाफारे घेण्याच्या मशीन रूग्णांच्या आवश्यकतेनुसार शुगर टेस्ट कीट उपलब्ध करून देणे, गरिबी-गरजूंना अन्नधान्य वितरण, आदिवासी वाड्यांवर मास्क सॅनिटायझर वाटप प्रत्यक्ष रुग्णांची सुश्रुषा करणे, रक्तदान शिबिर यासाठी उरणमधील अनेक सेवाभावी संस्था काम करीत आहेत.
यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे. प्रामुख्याने तालुक्यातील उरण सामाजिक संस्था, जिव्हाळा फाऊंडेशन, ओएनजीसी उरण एम्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी, उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन आदी संस्थाही कोरोना काळात आपआपल्यापरीने काम करीत आहेत.
कोरोनादरम्यान बाधित झालेल्या 3691 पैकी 3008 रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. उरण तालुक्यातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, जेएनपीटी, कोप्रोली या तीन केंद्रांवर मागील तीन महिन्यांपासून लसीकरण सुरू झाले आहे. या ती केंद्रांतून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, ही माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी दिली.