कर्जत : बातमीदार
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रदेखील वाढविण्यात येत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोनाविषाणूंची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ च्या माध्यमातून शासन, प्रशासनाने लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासोबतच नागरिकांना प्रतिबंधक लस देऊन कोरोनाशी मुकाबला केला जात आहे. सुरुवातीला फ्रंटलाईन वर्कर, 45 वर्षांवरील विशिष्ट आजार असलेल्या व्यक्ती यांचे लसीकरण करण्यात येत होते. आता 18 वर्षांवरील व्यक्तींचेसुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यातील प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या तालुक्यात कर्ज उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कशेळे, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ, कळंब, कडाव, मोहिली, खांडस आणि आंबिवली या आठ केंद्रात लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होत आहे. आता शासनाने 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या आठ केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी तालुक्यातील 20 आरोग्य उपकेंद्रांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण केंद्र वाढल्यामुळे गर्दीदेखील कमी होणार आहे. मागणीनुसारा लसीचा पुरवठा झाल्यास लसीकरण वेगात होऊन कोरोना संक्रमणाचा वेग कमी होईल.
18 वर्षांवरील नागरिकांसाठी स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये एक कक्ष कार्यान्वीत केला जाणार आहे. तिथे नाव नोंदणी केली जाईल, लसीकरणाची तारीख व वेळ दिली जाईल. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी होणार नाही. त्यासाठी तालुक्यात एकूण 28 लसीकरण केंद्र आम्ही कार्यान्वीत करत आहोत.
-सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत
शासन एका बाजूला लस देण्याचे जाहीर करते आणि दुसर्या बाजूला लस नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून माघारी फिरावं लागत. शासन आणि प्रशासन यांचा समन्वय नसल्याचे दिसून येते. ज्यांना केंद्रापर्यंत जाता येत नाही, त्यांना घरी लस देण्याची सोय करण्याची गरज आहे.
-जितेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, रायगड मनसे