श्रीगाव : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील कमलपाडा येथे श्रीराम मंडल कमलपाडा यांच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीराम नवमी उत्सवाचे औचित्य साधून रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कालंबादेवी युवक गडब संघाने जय हनुमान चरी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले. कालंबादेवी युवक गडब संघांला 15 हजार रुपये, जय हनुमान चरी संघांला 10 हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक भैरवनाथ पेझारी व अरुण पाटणी संघांला प्रत्येकी सात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले, तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेलाडू दिवेश मढवी (गडब), उत्कृष्ट चढाई प्रेसित बोरकर (अरुण पाटणी), उत्कृष्ट पकड जयेश पाटील (गडब), प्रेक्षक हीरो विनीत मोकल (चरी) यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. श्रीराम मंडल कमलपाडा यांच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त 67 वर्षांपासून एकदाही खंड न पडता कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून ही स्पर्धा सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायंकाळी 7 वाजता अंतिम सामना होऊन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पाडला जातो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीराम मंडळाच्या सर्व सहकारी व कमलपाडा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.