रोहे ः प्रतिनिधी
सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनहिताची काम केली आहेत. त्यामुळे देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचा दावा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे प्रचार सभेत केला आहे.
रोह्यातील राम मारुती चौकात 32 लोकसभा उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. या वेळी उमेदवार अनंत गीते, शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि मुंढे, किशोर जैन, माजी आ. तुकाराम सुर्वे, जि. प. विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, भाजप अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी शिवसेना नेते सूर्यकांत महाडिक, नाविद अंतुले, समीर शेडगे, सुलतान मुकादम यांसह अन्य नेत्यांची भाषणे झाली. समीर शेडगे यांनी रोह्यात शक्तिप्रदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय सभेसाठी उपस्थित होता. या वेळी धाटाव येथील युवकांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आतापर्यंत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी थापा मारण्यात आल्या, पण रायगड किल्ल्याचे कधीही संवर्धन झाले नाही, परंतु आपण स्वतः पुरातत्त्व खात्याच्या परवानग्या मिळवत 600 कोटी रुपये किल्ल्यासाठी आणले.
-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री
बॅ. अंतुले यांचा मुलगा नाविद अंतुले शिवसेनेत येणे म्हणजे ऐतिहासिक आणि राजकारणाला कलाटणी देणारी घटना आहे. राष्ट्रवादीवाले पूर्वी मोहल्ले हे राष्ट्रवादी पक्षाची जहागीरदारी समजायचे. त्यांची व्होट बँक समजायचे. आज नाविद अंतुले आल्याने त्यांनी ही जहागिरी खालसा करण्यास सुरुवात केली आहे.
-अनंत गीते, केंद्रीय मंत्री