लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
उरण : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विद्यालय द्रोणागिरी यांचा 11 वा वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थी व गुणवंत शिक्षकांचा सत्कार समारंभ गुरुवारी (दि. 19) दिमाखात झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी शैक्षणिक वर्षात विविध शालेय उपक्रमांत नैपुण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांचा तसेच गुणवंत शिक्षकांचा संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या लेझीमच्या तालावर आगमनाने झाली. त्यानंतर दिपपूजन ईशस्तवन व स्वागतगीताने मंचावर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. या वेळी विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुण सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या कार्यक्रमास पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे सचिव एस. टी. गडदे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, संस्थेचे सहसचिव भाऊसाहेब थोरात, शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, स्कूल कमिटी मेंबर शेखर तांडेल, सुनील पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, पी. जे. पाटील, गोपाळ पाटील, रवी भोईर, सायली म्हात्रे, पी. टी. ए. मेंबर्स शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांकडून शाळेचे कौतुक
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भविष्यातील शिक्षण कुठल्या प्रकारचे असेल भविष्यातील जगाची गरज काय हे बघून भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयात आम्ही शिक्षण देत असल्याचे सांगत आता शिक्षण म्हणजे फक्त मार्क नव्हेत तर विद्यार्थ्याला असणारी आवड आणि छंद होत असल्याचे प्रतिपादन केले. तर आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करत संस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.