पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 16साठी स्वतंत्र लसीकरण केंद्राची उपलब्धता करा, अशी मागणी भाजप नगरसेविका राजश्री वावेकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका वावेकर यांनी निवेदनात म्हटले की, शासनाकडून 18 ते 44 वयोगटातील सर्वच नागरिकांना लसीकरण करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नागरिकांची लस घेण्याकरीता गर्दी होते, याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठा ताण येतो. ही गर्दी टाळण्यासाठी माझ्या प्रभाग क्र.16 साठी स्वतंत्र लसीकरण केंद्रांची मागणी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून माझ्या प्रभागातील खासगी हॉस्पिटल किंवा शाळेमध्ये लसीकरण केंद्राची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रभाग क्र.16 साठी महानगरपालिकेकडून स्वतंत्र लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पत्रान्वये करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना पाठविण्यात आली आहे.