भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचे आता कुठे सुचले यावर टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. वास्तविक यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. हा एक व्यावहारिक निर्णय आहे. क्रिकेटपटूंची सुरक्षितता आणि आरोग्य यांना सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आयपीएल स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयपीएल नियोजन समितीच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. सर्व सहभागी क्रिकेटपटूंना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्याची जबाबदारीदेखील मंडळाने घेतली आहे. आयपीएल रद्द झाल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला असेल यात शंका नाही.
गेले 20-25 दिवस सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अखेर फज्जा उडाला. देशभरात बिघडत चाललेल्या कोरोना महासाथीच्या परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धेचे पुढील सर्व सामने रद्द करावे लागले आहेत. वास्तविक ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जात होती. खेळाडू आणि पदाधिकार्यांसाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था होती. अत्यंत सुरक्षित अशा जैविक संरक्षणामध्ये हे सर्व सहभागी क्रिकेटपटू राहत होते. इतकेच नव्हे तर या खेळाडूंचा सरावदेखील अत्यंत संरक्षित वातावरणामध्ये झाला होता. आयपीएल स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या संघांची मालकी विविध उद्योजक आणि नामवंत कलावंतांकडे आहे हे सर्वांना ठाऊक आहेच. गेले 14 महिने आपला देश कोरोना विषाणूशी झुंजत आहे. गेल्या वर्षीदेखील आयपीएल स्पर्धा भारतात न खेळवता संयुक्त अरब अमिरातीत सुरक्षित वातावरणात खेळवण्यात आली होती. तेव्हा खरंतर रुग्णसंख्या आताच्या तुलनेत कमी होती. कोरोनाची दुसरी लाट भारतामध्ये अतिशय वेगाने व अनेक पट जोराने आली. यंदा आयपीएलचा घाट घालण्यात आला तेव्हा पहिली लाट बर्यापैकी ओसरली होती. लोक काहिसे बेसावध झाले होते. त्याच कालखंडामध्ये आयपीएल क्रिकेटपटूंचा लिलाव, संघबांधणी, आयोजन, प्रक्षेपणाचे व्यवहार या सार्या गोष्टी पार पडल्या, परंतु स्पर्धा सुरू होई-होईपर्यंत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. परिणामी रिकाम्या स्टेडियममध्ये व जैव-सुरक्षित वातावरणात सामने खेळवायची वेळ आयपीएलच्या आयोजकांवर म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ओढवली. वास्तविक ही स्पर्धा यंदा मुळातच रद्द केली असती तर अधिक बरे झाले असते असा सूर आता आळवला जात आहे. कारण जैव-सुरक्षित वातावरणात राहूनदेखील कोलकाता नाइट राइडर्स या संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह निघाले. चेन्नई सुपरकिंग्ज या संघात यापूर्वीच सहायक कर्मचार्यांपैकी दोघे जण कोरोना विषाणूच्या बाधेने ग्रस्त झाले. त्या संघाचे प्रशिक्षकदेखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले. काही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी गेल्याच आठवड्यात यापुढील सामने आपण खेळू शकत नसल्याचे मंडळाला कळवले होते. तसेच आम्हाला घेऊन जाण्यासाठी विशेष विमान पाठवावे, अशी विनंती ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. त्याच वेळेस आयपीएल स्पर्धेचा गाशा गुंडाळावा लागणार याची चिन्हे दिसू लागली होती. देशभरातील लॉकडाऊनसदृश परिस्थितीत आयपीएलचा विरंगुळा महत्त्वाचा होता. आता यापुढे तो नसेल. आयपीएलमधून मिळणार्या कोट्यवधींच्या कमाईवर मंडळाला पाणी सोडावे लागणार आहे. आयपीएलच्या माध्यमातून कराच्या रूपाने देशाच्या तिजोरीत परकीय चलन पडत होते. त्यालाही मुकावे लागणार आहे. लवकरात लवकर ही साथ आटोक्यात आल्यास व येत्या काही महिन्यांत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यास आयपीएलची मजा पुन्हा एकदा उत्साहाने घेता येईल.