नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडकोकडून शुक्रवारी (दि. 7) आगार प्रवेश छन्नमार्गावर आणि तळोजा आगारातील चाचणी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात येऊन, ही चाचणी यशस्वीरीत्या झाली. या वेळी एकूण 850 मीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली. सुरक्षिततेच्या कारणास्तव मेट्रोचा वेग कमी ठेवून तो 65 कि.मी. प्रती तास इतका राखण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांकडून, शासनाने जारी केलेल्या कोविड-19 विषयक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण चार उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. तळोजा आगार येथील आगार प्रवेश छन्नमार्गावर (प्रोच व्हायडक्ट) मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोविड-19 महासाथीचा प्रादुर्भाव वाढत असूनही नवी मुंबई मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा याकरिता सिडको प्रयत्नशील आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानुसार महा मेट्रोकडून 23 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्र. 1 वरील स्थानक 7 ते 11 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2021 अखेरीस आणि स्थानक 1 ते 7 दरम्यान साधारणत: डिसेंबर 2022 अखेरीस वाणिज्यिक परिचालनास (प्रवासी वाहतुकीस) सुरुवात होणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.
नवी मुंबईकरांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. म्हणून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊन नवी मुंबईकरांच्या सेवेत रूजू व्हावा याकरिता सिडको प्रयत्नशील आहे. मार्ग क्र. 1वर मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्याने या मार्गावर लवकरच मेट्रो धावू लागेल. -डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको