उरण : वार्ताहर
राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातही कमालीचे कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. उरण शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता उरण नगर परिषदेच्या वतीने शहरात बुधवार (दि. 5) पासून दंडात्मक कारवाई व दंड वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवार ते शुक्रवार या दिवसांत शासकीय नियमाचे पालन न करणार्यावर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने (कपडे, तंबाखू, गुटका) उघडी होती. तिथे मालाची विक्री करीत असल्याने नऊ दुकाने सील करण्यात आली आहेत व ती दुकाने लॉकडाऊन संपल्यानंतर उघडण्यात येतील. अत्यावश्यक सेवेत नसलेली दोन दुकाने यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. 14 दुकानांसमोर गर्दी दिसून आली. सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्याने प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात आला. विना मास्क फिरणार्या 15 व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर विक्री करणार्यांना वीर सावरकर मैदान (लाल मैदान) व एन. आय. हायस्कूल येथे उरण नगर परिषदेने जागा नेमून दिली आहे. पूर्व सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या तरीही नियमांचे पालन न केल्याने रस्त्यावर विक्री करणार्या 20 जणांचे समान जप्त करण्यात आले. या मोहिमेत उरण नगर परिषदचे मुख्याधिकारी संतोष माळी सह कर्मचारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक गवते, पोलीस हवालदार भाट व स्टाफ आदी उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव उरणमध्ये वाढतच चालला आहे. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी 7 ते दुपारी 11पर्यंत दुकाने असतात. त्यात किराणा, भाजीपाला, फळ आदी दुकाने उघडी असतात. या वेळेस सामानाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामध्ये विना मास्क फिरणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे उरण नगर परिषदचे मुख्याधिकारी संतोष माळी व नगरपरिषदचे कर्मचारी यांनी शासकीय नियमांचे पालन न करणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. उरण नगर परिषदेची कारवाई अशीच या पुढेही सुरूच राहील. नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करत राहणे, सॅनिटायझरचा वापर केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. अत्यावश्यक सेवे व्यतिरीक्त इतर आस्थापने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
-संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद