पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमध्ये रोज वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू, याशिवाय तज्ज्ञांचे मते देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पनवेलमध्ये पोदी शाळेत नवीन लसीकरण केंद्र सुरू करा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. 7) महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत आठ लसीकरण केंद्र असून त्यापैकी फक्त एक नवीन पनवेलमध्ये आहे. नवीन पनवेलमध्ये गुरुवार 6 मेपर्यंत 926 विद्यमान कोरोनाचे रुग्ण असून एकूण 228 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका हद्दीत सर्वांत जास्त मृत्यू नवीन पनवेलमध्ये झालेले आहेत. नवीन पनवेलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या ठिकाणी लसीकरण केंद्र एकच असल्याने अनेक नागरिकांना लस घेणे शक्य होत नाही किंवा लस घेण्यासाठी खर्च करून पनवेल किंवा खारघरला जावे लागते. शासनाने 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांनाही लसीकरण सुरू केल्याने या केंद्रांवर गर्दी वाढत आहे. याशिवाय तज्ज्ञांचे मते देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नवीन पनवेल प्रभाग 17 मधीलमध्ये पोदी शाळा, संत साईबाबा शाळा, डीएड कॉलेज आणि सिडको ऑफिस (नवनाथ नगर) येथे लसीकरण केंद्र सुरू केल्यास नागरिकांना लस घेणे सोयीचे होईल, असे शुक्रवारी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या पत्रात नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी म्हटले आहे.