खांदा वसाहतीमध्ये खड्डेमुक्ती श्रमदान; माजी उपमहापौर सीताताई पाटील, एकनाथ गायकवाड, अभिषेक भोपी यांचा पुढाकार
पनवेल : वार्ताहर
खांदा वसाहतीत रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाने थैमान घातल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या कारणाने भारतीय जनता पक्षाने श्रमदान करून हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. या कामी माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि अभिषेक भोपी यांनी पुढाकार घेतला.
महानगर गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी खांदा वसाहतीतील रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले आहेत. ते पूर्ववत करण्याची तसदी सिडकोने घेतलेली नाही. त्याचबरोबर इतर रस्त्यांची देखभाल डागडुजी करण्याकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्याचबरोबर वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
पनवेल महानगरपालिकेने हे रस्ते दुरुस्त करण्याकरता सकारात्मक भूमिका घेतली आहे. महासभेने मंजुरी सुद्धा दिली आहे. परंतु निविदा प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने सध्या महापालिकेचे हात बांधले आहेत. सिडकोने मनपाकडे बोट दाखवत एक प्रकारे हात वर केले आहेत. त्यामुळे पनवेलच्या माजी उपमहापौर सीताताई सदानंद पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अभिषेक संजय भोपी यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी श्रमदान करून ज्या ज्या ठिकाणी अत्यंत धोकादायक खड्डे आहेत. ते माती आणि खडी टाकून बुजवले. संजय भोपी प्रतिष्ठानचे ऋषिकेश साबळे, रोहित साबळे, सुजय कदम, अनिकेत सानप, अमित खरात, यश राठोड यांच्यासह इतरांनी श्रमदानामध्ये सहभाग नोंदवला.
खांदा वसाहतीतील रस्ते खड्डेमुक्त असावेत यासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आता या रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी लवकरच महापालिका घेणार आहे. महासभेने त्याला मंजुरी दिली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एजन्सी नियुक्त होणार आहे. त्याला काहीसा वेळ लागत असल्याने आम्ही सीताताई पाटील आणि एकनाथदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान करून धोकादायक खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.
-अभिषेक संजय भोपी, शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, खांदा कॉलनी